वर्धा: स्वयंपाकगृह म्हणजे अन्नपूर्णेचा निवास. घरातल्या घरात एकाच खोलीस घर म्हटल्या जाणारे हे स्थळ. ते नेटके व स्वच्छ असावे म्हणून गृहिणी दक्ष असतात. कारण किडे व अन्य किटके यामुळे अन्न खराब होवू शकते. परिणामी विषबाधा अटळ. म्हणून या गृहाबाबत काळजी घेणे अनिवार्य. तीच बाब शाळेतील स्वयंपाकगृहाची.

शाळेत शिजविल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अश्या घटना घडू नये म्हणून शालेय शिक्षण खात्याने काही मानक निश्चित केले आहे. पंतप्रधान पोषण शक्ती योजनेत अनुचित प्रकार टळावेत यासाठी ही दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

अन्नात विषबाधा होण्यास काही घटक कारण ठरतात. बॅक्टरिया, विषाणू, परजीवी तसेच रासायनिक जंतूनाशके, अन्न संरक्षक द्रव्य, अतीप्रमाणात रंग द्रव, धाण्याची चुकीची हाताळणी व अन्य बाबी विषबाधा निर्माण करतात. ती झाल्यास मळमळ, डोकेदुखी, जुलाब, ताप, अशक्तपणा, अंगदुखी व तत्सम व्याधी होतात.

म्हणून काळजी अपेक्षित. म्हणून येणाऱ्या धाण्याची तपासणी करावी, योग्य नसल्यास बदलून घ्यावे, किराणा मालाची वापरण्याची मुदत तपासावी, ती एक वर्षाची असावी, धान्य उंच जागेवर ठेवावे, स्वच्छ पेयजल, विद्यार्थ्यांची बसण्याची जागा व भांडी स्वच्छ असावी, स्वयंपाकगृह व परिसरात किडे, उंदीर, घुशी, साप, मांजर झुरळ यांचा वावर असू नये, मसाला किडमुक्त असावा अश्या सूचना आहेत. तसेच शाळा परिसरात अनधिकृत खाद्यपदार्थ विकल्या जात असल्यास त्यास प्रतिबंध केला पाहिजे. शाळेत बाहेरील संस्था स्नेहभोजन ठेवतात. त्या भोजनाचा दर्जा तपासून घ्यावा.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दर महिन्यास धान्य पुरवठादाराच्या गोदामास भेट देऊन तपासणी केली पाहिजे. गोदाम अस्वच्छ दिसून आल्यास पुरवठादारास समज देत ५० हजार रुपयाचा दंड आकारावा. दुसऱ्या तपासणीत परत अस्वच्छ दिसून आल्यास एक लाख रुपये दंड आकारावा.शाळेतील आहाराची प्रयोगशाळा तपासणी करावी. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन शाळांची निवड करीत आहाराचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीस यांची पोषण आहार अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन केल्या जावे. आहार तयार करण्याची पद्धत व अन्य बाबींसाठी. विषबाधेच्या काही गंभीर प्रकरणात डिहायड्रेशन तसेच स्नायू, किडनी व मुलांच्या अन्य अवयवावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी लिस्ट्रिया, सॅल्मोनेला, रोटाव्हायरस, नोरो व्हायरस, जिआर्रडिया व तत्सम बॅक्टरिया कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस यांनी विषबाधा होवू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक ठरते.