नागपूर : प्राचीन काळात ऋषीमुनींना मानवी जीवनाचे अंतिम शाश्वत सत्य गवसले, पण आधुनिक विज्ञानाला ते अद्याप सापडले नाही. विज्ञान अजूनही चाचपडतच आहे. अध्यात्म हा भारताचा आत्मा असून त्याच आधारावर भारत जगाला कवेत घेण्याची क्षमता ठेवतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्राची चिंतन बैठक नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात गुरुवारी पार पडली, त्यात ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या ऋषीमुनींना जेव्हा बाहेरच्या सृष्टीत पूर्णत्व दिसले नाही, तेव्हा त्यांनी अंतर्मनात त्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना अंतिम  सत्य प्राप्त झाले. परंतु विज्ञान अजूनही त्याचा शोध घेतच आहे, हे सांगताना सरसंघचालकांनी अपघातानंतर कोमात गेलेल्या रुग्णांच्या अभ्यासावरील एका पुस्तकाचा दाखला दिला. ते म्हणाले, अनेकदा अपघातानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही अनेकजण जिवंत राहतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारच्या एक हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात वेगवेगळय़ा पार्श्वभूमीचे लोक होते. जेव्हा ते कोमातून बाहेर आले तेव्हा त्यांचे अनुभव मात्र सारखे होते. ‘आपल्याला कोणीतरी खेचत होते आणि कोणीतरी परत पाठवा, असे आदेश देत होते’ असे कोमातून बाहेर आलेले लोक सांगत होते. त्यालाच ‘लाईफ ऑफ्टर डेथ’ असे म्हणतात. ही केवळ आपल्या परंपरेची गोष्ट नाही तर याचा विज्ञानही शोध घेत आहे. पण अद्याप मार्ग सापडत नाही, असे सरसंघचालक म्हणाले.

पाश्चिमात्यांची विकासाची संकल्पना अपयशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय नागरिक सर्वानाच आपले मानतो. त्यामुळेच आपण श्रीलंका, मालदीवसारख्या देशांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करतो. युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांसोबतच इतर देशातील लोकांची आपण सुटका करतो. भारतीय लोक मर्यादित स्वरूपातच मांसाहार करतात. मात्र  पाश्चिमात्य देशात दररोज त्याचे सेवन केले जाते. त्यांची विकासाची संकल्पना अपयशी ठरली आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.