अकोला : महापारेषणमध्ये अकोला व कारंजा येथे भंगार विक्रीचा मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही ठिकाणी मिळून ११ हजार ३६५ किलो भंगार विक्री कमी दाखविण्यात आली आहे. या प्रकरणी जबाबदार आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महापारेषणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापारेषणमध्ये शहरातील गोरक्षण मार्गावरील कार्यालय व कारंजा येथे भंगार विक्रीमध्ये मोठी अनियमितता झाल्याचे समोर आले. सारणीवरून वर्ष २०१८ मध्ये ६६ के. व्ही. विलेगांव कारंजा वाहिनीचे भंगार साहित्य निव्वळ वजन ९१ हजार ८०० किलो ग्रॅम असताना वर्ष २०२० मध्ये प्रस्ताव तयार करताना त्याचे एकूण वजन ८५ हजार २१० किलो ग्रॅम विचारात घेतलेले आहे. प्रस्तावात सहा हजार ५९० किलो ग्रॅम कमी वजन दाखवले. त्यामुळे भंगार साहित्याची चोरी झाल्याचा संशय बळावला आहे. प्रस्तावात सहा हजार ५९० किलो ग्रॅम कमी वजन दाखविले. १४ व १५ एप्रिल २०२२ रोजी १३२ के.व्ही. अकोला गोरक्षण उपकेंद्र येथून संबंधित खरेदीदारास दिलेले भंगार साहित्य चार हजार ७७५ किलो ग्रॅम कमी होते. त्याचे मुल्य एक लाख पाच हजार ५० रुपये आहे. एकूण दोन लाख ५० हजार ०३० रुपयांच्या भंगार साहित्यामध्ये अनियमितता झाली.

हेही वाचा – वाशिम : …अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: तासभर केली स्वच्छता!

हेही वाचा – केवळ १४ मिनिटांत बिलासपूर-नागपूर ‘वंदे भारत ट्रेन’ची स्वच्छता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांनी गैरर्वनाचे कृत्य केल्याचे समोर आल्याने जबाबदार आठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये कार्यकारी अभियंता रमेश वानखडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील, दत्ता शेजोळे, श्याम मेश्राम, उपकार्यकारी अभियंता गोपाल लहाने, श्रीकांत टेहरे, उपव्यवस्थापक वित्त व लेखा सुरेश पेटकर व उपव्यवस्थापक संजीत मेश्राम यांचा समावेश आहे. पदावर कायम राहिल्यास प्रस्तावित विभागीय चौकशीला बाधा येण्याची शक्यात लक्षात घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.