विद्यापीठाच्या परीक्षेतील तांत्रिक उणिवांचा विद्यार्थ्यांना फटका

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक उणिवांमुळे तब्बल १४०० विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावी लागल्याचे विधिसभा बैठकीतील उत्तरादरम्यान समोर आले. यातील गमतीदार किस्सा म्हणजे, गणित विभागाचा एक विद्यार्थी घरी ऑनलाईन परीक्षा देत असताना त्यांच्या मागच्या खिडकीवर डोरेमॉनचे चित्र असलेला पडदा काहीसा हलला. त्यामुळे त्या खोलीत दुसरा कुणी व्यक्ती असल्याचा आक्षेप ‘प्रॉक्टरिंग’ मशीनने घेतला व तो कॉपी करत असल्याचे दर्शवून त्याला परीक्षेतून बाद करावे लागले. अशा प्रकारांवर बैठकीदरम्यान सदस्यांनी आक्षेप घेतला.

विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१च्या परीक्षेदरम्यान अनेक नियमांमध्ये बदल केला होता. परीक्षा ऑनलाईन असली तरी  परीक्षेत काहीही गडबड करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर ‘प्रॉक्टरिंग’च्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. ‘प्रॉक्टरिंग’मध्ये जे विद्यार्थी परीक्षा सुरू असताना मोबाईलवर छेडछाड करतात. काहींच्या मोबाईलवर  काही नोटीफिकेशन येतात किंवा कुठली वस्तू हलताना दिसली तरी त्या विद्यार्थ्यांवर परीक्षेत गैरप्रकाराचा आरोप केला जातो. अशा गैरप्रकाराचा आरोप असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अनुपस्थित दाखवण्यात येते. त्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते. उन्हाळी परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवल्याच्या तक्रारी होत्या. यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.  यावर परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी १४०० विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याचे  सांगितले. परीक्षेतील या चुकांसाठी विद्यापीठाने एक समितीही स्थापन केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची बाब समोर आली. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली.