लोकसत्ता टीम
नागपूर: शिवसेनेच्या स्थापनेनंतर प्रथमच मुंबईत पक्षाचा स्थापना दिन दोन ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याला कारण ठरले ती शिवसेनेतील फूट. नागपुरात दोन्ही गटांचे स्वतंत्र अस्तित्व आहे.पण एकाही गटाकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला नाही.
नागपूर जिल्ह्यात एकसंघ शिवसेनेचा एक खासदार ( रामटेक लोकसभा) आणि एक आमदार ( रामटेक विधानसभा) आहे. दोन्ही सध्या शिंदे यांच्या सोबत आहेत. उध्दव ठाकरे गटाची शिवसेनाही जिल्ह्यात सक्रिय आहे. दोन्ही गटांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत. मात्र दोन्ही गटांकडून स्थानिक पातळीवर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाले नाही. दोन्ही गटातील सैनिकांचे लक्ष मुंबईतील कार्यक्रमाकडेच होते.
शिंदे गटातील काही शिवसैनिक मुंबईच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.ठाकरे गटाच्या सैनिकांमध्येही वर्धापन दिनाचा उत्साह नव्हता. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘गद्दार दिन’ साजरा करून शिंदे गटाला डिवचले.