अकोला : विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी अपघाती निधन झाले. तुकाराम बिडकर यांना वर्षभरापूर्वीच आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का? अशी आता चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात मृत्यूवर त्यांनी भाष्य केले. जन्मभूमीतच मरण येऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे त्यांनी नमूद करून

‘मन मरे माया मरे। मरमर गये शरिर…

आशा तृष्णा ना मरे। कह गये दास कबीर’

अशा संत कबीरांच्या दोह्यांनी तुकाराम बिडकर यांनी पुस्तकाचा शेवट केला होता.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी गेले असता अपघातात प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे सहकारी राजदत्त मानकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वर्षभरापूर्वी ‘माझं गाव, माझ्या आठवणी’ या पुस्तकात तुकाराम बिडकर यांनी आपल्या मृत्यूवर लिखाण केले आहे. 

तुकाराम बिडकर यांनी लिहिले की, ‘हे ईश्वरा मला मृत्यू जन्मभूमीतच दे. माझ्या गावकऱ्यांच्या खांद्यावरून मला शेवटच्या यात्रेला निघू दे. माझे पार्थिव गावातच आणा. जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात ठेवावे, तेथे श्रमदान करून माझे नेते शरदचंद्र पवार यांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते. त्याच ठिकाणी माझे पार्थिव ठेवा. बी.पी.एड. कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा. तिथेच मला मुलगा पवन याच्या हातून अग्नी द्या. कोणताही विधी करू नका. माझी राख इतरत्र कोठेही नेऊ नका, ती लोणार नदीत विसर्जित करा. ओंकारेश्वर हे माझं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण. माझ्या अस्थी नर्मदा मातेच्या उदरात विसर्जित करा. काही राख जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात टाका, जेणेकरून माझ्या शाळेचे, मंडळाचे खेळाडू त्यावर खेळतील आणि मला त्यातून आनंद मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही इच्छा अपूर्ण राहिली

तुकाराम बिडकर यांनी पुस्तकात एक इच्छा व्यक्त केली होती. ‘दुःख नाही पण माझ्या हुकलेल्या जि.प. अध्यक्ष पदावर अन क्रीडा मंत्री पदावर गावातलं कुणी तरी बसलेलं मला पहायचं आहे. सिनेमाच्या, कलावंताच्या क्षेत्रातही मी खूप प्रयत्न केले, पण त्या उंचीपर्यंत जाता आल नाही. पण गावातील कुणी त्या उंचीवर पोहचलेला मला पाहायचं आहे,’ असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते. मात्र, ती इच्छा अपूर्ण राहिली.