बाळ जन्मताच तपासणी होणार; मेडिकलमध्ये औषधोपचार सुरू
नागपूर : मेडिकलमधील २९ वर्षीय करोनाग्रस्त गर्भवतीच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र शल्यक्रियागृह तर प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी स्वतंत्र दक्षता गृहाचे नियोजन केले जात आहे, तर बाळाचा जन्म होताच त्याचीही करोना तपासणी करून तो सकारात्मक किंवा नकारात्मक आल्यास त्यादृष्टीनेही उपचाराचे नियोजन सुरू आहे. सध्या गर्भवतीला रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासह प्रतिजैविकं औषध दिल्या जात आहे. परंतु त्याचेही प्रमाण कमीच ठेवावे लागत आहे.
नागपूरच्या सतरंजीपुरात दगावलेल्या एका करोनाग्रस्ताच्या घराशेजारी या नऊ महिन्यांच्या गर्भवतीचे कुटुंब राहते. तिला एक दोन वर्षांची मुलगी आहे. ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. घरात पाहुणा येणार असल्याने हे कुटुंब आनंदात होते. परंतु करोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबालाही महापालिकेने खबरदारी म्हणून सक्तीच्या विलगीकरणासाठी आमदार निवासात ठेवले होते. येथे करोना असल्याचे निदान होताच तिला उपचारासाठी मेडिकलला हलवले गेले. वैद्यकीय तपासणीत तिला मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रसूती होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
तिच्यावर येथील पेईंग वार्डात उपचार सुरू असून तिला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्विन गोळ्यांसह इतर एका प्रतिजैविक औषधांची मात्रा तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुरू करण्यात आली आहे. परंतु गर्भवती असल्याने तिला औषधांची मात्रा कमी ठेवावी लागत आहे. या औषधांचा प्रतिसाद बघत तिच्या उपचाराची इतर दिशा तज्ज्ञ निश्चित करतील. या महिलेमुळे इतरांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून मेडिकलमध्ये स्वतंत्र शल्यक्रिया गृह व त्यानंतर तिला ठेवण्यासाठी दक्षतागृहाची सोय केली जात आहे. येथे इतर कुणाचीही प्रसूती केली जाणार नाही. महिलेला बाळ होताच त्याला खबरदारी म्हणून वेगळे करत त्याचीही तातडीने करोना तपासणी केली जाणार आहे.
गर्भातील बाळावर दुष्परिणामाचा धोका कमी
गर्भवतीला करोना विषाणूची लागण असली तरी सध्या तिच्यात सर्दी, खोकला, तापासह इतर एकही लक्षण नाही. ९ महिने पूर्ण होत असल्याने तिच्या गर्भातील बाळ पूर्ण विकसित असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या बाळावर औषधांच्या दुष्परिणामाचा धोका कमी आहे. परंतु प्रसूतीदरम्यान महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यास तिच्या आरोग्यालाच डॉक्टरांकडून जास्त प्राधान्य दिले जाणार असून दुसरे प्राधान्य बाळाला दिले जाणार असल्याची माहिती एका तज्ज्ञाने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितली.
‘‘उपचारादरम्यान गर्भवती महिलेच्या आहारापासून औषधोपचारापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून बारीक लक्ष दिले जात आहे. या विषाणूची बाधा इतरांना होऊ नये म्हणून तिची प्रसूती स्वतंत्र शल्यक्रियागृहासह तिच्यासाठी मेडिकलला वेगळे दक्षता गृहाची सोय केली जात आहे. शेवटी प्रशासनावर प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याची जवाबदारी आहे.’’
– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर.