अकोला : राज्यात रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी देणे म्हणजे मुस्लीम समाजाचा अपमान करणे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून वगळून अल्पसंख्यांक विभागाचा पदभार दुसऱ्या जबाबदार मंत्र्यांकडे देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात एका गंभीर घटना समोर आली. लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधिमंडळामध्ये कृषिमंत्री चक्क रमी खेळतानाची चित्रफित समोर आली. या प्रकरणात विरोधकांनी आक्षेप घेऊन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या गंभीर प्रकरणात मंत्र्यांकडून राजीनामा न घेता त्यांचे केवळ खातेबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांना अल्पसंख्यांक देण्यावर तीव्र आक्षेप घेतला.
विधानभवनाच्या कामकाजादरम्यान मोबाइलवर रमी हा जुगाराचा खेळ खेळताना मंत्री आढळून आले. त्यानंतर संबंधित मंत्र्यांचे कृषी खाते काढून त्यांना क्रीडा मंत्री बनवण्यात आले. यासोबतच त्यांच्याकडे अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी देण्यात आली. हे अत्यंत दुःखद आणि प्रशासनाच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे जावेद जकरिया यांनी पत्रात नमूद केले आहे.
सर्व अल्पसंख्यांकांच्या आत्मसन्मानाशी थट्टा
माणिकराव कोकाटे यांच्याकडे अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी देण्याचा निर्णय केवळ चुकीचा नाही, तर राज्यातील मुस्लिमांसह सर्व अल्पसंख्यांकांच्या आत्मसन्मानाशी थट्टा करणारा आहे. बेजबाबदार कृत्य करणाऱ्या मंत्र्यांकडे अल्पसंख्यांक विभाग देणे म्हणजे सरकारला जबाबदारीची जाण नसून अल्पसंख्यांक समाजाच्या भावना समजून घेण्याची तयारी नसल्याचा संदेश दिला जात असल्याचा आरोप जावेद जकरिया यांनी केला.
संबंधित मंत्र्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढावे, अल्पसंख्यांक विभागासारख्या संवेदनशील खात्याचा पदभार एका जबाबदार, संवेदनशील आणि समाजाची जाण असलेल्या योग्य व्यक्तीकडे देण्यात यावा, अशा मागण्या देखील त्यांनी पत्रातून केल्या आहेत.
मुस्लीम समाज अत्यंत व्यथित विधिमंडळ सभागृहात रमीचा डाव खेळणाऱ्या मंत्र्यांकडे अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी दिल्यामुळे मुस्लीम समाज अत्यंत व्यथित झाला. या पत्राची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन न्याय आणि संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जावेद जकरिया यांनी व्यक्त केली.