बुलढाणा : विविध आरोग्य यंत्रणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या भेटी, सर्वेक्षणाचा धडाका आणि आज शनिवारपासून सुरू झालेला नेत्यांच्या सांत्वनपर भेटीचा सिलसिला, असा सध्या शेगाव तालुक्यातील ‘त्या’ गावांमधील माहोल आहे. ‘भय इथले संपत नाही,’ असे भयावह आणि विदारक चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे.

शेगाव तालुक्यात कमीअधिक पाच दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या आकस्मिक केसगळती आणि टक्कल या अनामिक आजाराचा प्रसार किंबहुना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. यावर कळस म्हणजे या विचित्र तथा भीतीदायक आजाराने आज शेगाव तालुक्याच्या सीमा ओलांडल्या असून शेजारील नांदुरा तालुक्यात शिरकाव करीत भयाची व्याप्ती वाढविली आहे. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावात केसगळती आणि टक्कलचे सात रुग्ण आढळून आल्याने नांदुरा तालुका आणि आरोग्य यंत्रणा हादरल्या!

हेही वाचा – Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…

आज संध्याकाळी उशिरापर्यंत वाडीत सर्वेक्षण करण्यात आले. गावात आढळलेल्या सात रुग्णांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण तीन ते ४५ वयोगटातील आहेत. वाडी गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच केस, रक्त आणि नखांचे नमुने संकलित करण्यात आले आहे.

रुग्णसंख्येत वाढ

शेगाव तालुक्यातील रुग्णसंख्येत आजही वाढ झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी शेगावमधील १२७ च्या तुलनेत आज ही संख्या १३९ झाली आहे. नांदुरामधील रुग्ण मिळून ही संख्या १४६ झाल्याचे वृत्त आहे.

रक्तदोषाचा संबंध नाही

शेगाव तालुक्यातील ११ गावातील ६५ गावकऱ्यांचे रक्तनमुने शुक्रवारी घेण्यात आले होते. मात्र केसगळतीशी रक्ताचा (रक्तदोषाचा) काही संबंध नसल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा – ‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश

हेवी मेटल्स तपासणी नाशकात

बाधित गावातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळून आले. तसेच यात अर्सेनिक, मर्क्युरी, कॅडमिनियम, याचे प्रमाण जास्त असल्याची शक्यता आहे. या तपासणीसाठी जलनमुने नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली-चेन्नईतील शास्त्रज्ञांची चमू

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव तालुक्यातील बाधित गावांना आज भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य यंत्रणांचा लवाजमा होता. गावकऱ्यांसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनी गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केसगळती हा आजार कशामुळे झाला, हे शोधण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई येथून विशेष तज्ज्ञ शास्त्रज्ञांची चमू बोलवण्यात आली आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या विचित्र केसगळती आजारावरचे संशोधन करीत आहे. नागरीकांनी घाबरून नये, असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.