लाखोंच्या रंगरंगोटीवर पाणी, नागरिकांमध्ये संताप
नागपूर : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत फलक आणि पोस्टर्समुळे लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या महामेट्रोच्या खांबाचे विद्रूपीकरण झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महामेट्रोने याची दखल घेतली असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
भाजपचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर नागपुरात मंगळवारी सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. राजकीयदृष्टय़ा शहरात विशेष प्रभाव नसलेल्या शिवसेनेने आदित्य यांचे सेनास्टाईल स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. विमानतळापासून तर ठाकरे यांचा कार्यक्रम असलेल्या हिंगणा मार्गावरील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी भव्य स्वागत फलक लावण्यात आले होते. यात वर्धा आणि हिंगणा मार्गावरील मेट्रोमार्गिकांचाही समावेश होता.
वर्धामार्गावर मेट्रोची सेवा सुरू झाल्याने तेथील निम्म्या खांबाची रंगरंगोटी पूर्ण झाली असून हिंगणा मार्गावर लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याने या मार्गावरील खांब रंगवण्यात आले आहे. यासाठी वापरण्यात येणारा रंग हा महागडा आहे. त्यामुळे खांबाच्या सौंदर्यात भर पडते. त्याचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून महामेट्रोने त्यावर पत्रक किंवा फलक लावण्यास मनाई केली आहे. लावल्यास पोलिसांकडे तक्रार केली जाते. अशाप्रकारे एक तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी महामेट्रोने केली आहे. दुसरीकडे राजकीय फलक सार्वजनिक ठिकाणी लावू नये, असे उच्च न्यायालयाचेच आदेश आहे. या सर्वाना धाब्यावर बसवून आज सेनेने मेट्रोच्या वर्धा आणि हिंगणा मार्गावरील खांबावर आदित्य यांच्या स्वागताचे फलक लावले. हिंगणा मार्गावर कागदी पोस्टर्सही चिटकवण्यात आले. हिरवळ लावण्यात आलेले खांबही यातून सुटले नाहीत. वर्धा मार्गावर रात्री उशिरापर्यंत मेट्रोची कामे सुरू असतात. त्यामुळे फलक लावताना प्रतिबंध का करण्यात आला नाही, असा सवाल केला जात आहे. केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी अशाप्रकारे विद्रूपीकरण करण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आली होती. तेव्हाही सार्वजनिक ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर दंड करणारी महापालिका आता शिवसेनेवर कारवाई करणार का, असा सवालही केला जात आहे.
‘‘मेट्रोच्या खांबावर लावण्यात आलेल्या राजकीय फलकांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करीत आहोत. या प्रकरणात काय कायदेशीर कारवाई करता येईल, यासाठी सल्ला घेतला जात आहे.
– महामेट्रो, नागपूर</strong>
नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकते उत्साही असतात. त्याच भावनेतून त्यांनी फलक लावले, ते आम्ही काढून घेऊ.
– प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख, शिवसेना