चंद्रपूर : काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस चार आमदारांसह माजी आमदारांना मुंबईत बोलावून घेत लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली. लोकसभा जिंकायची असेल तर ओबीसी, बहुजन किंवा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तथा चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार द्यावा, बाहेरचा उमेदवार लादू नये अशी साद आमदारांनी घातली. दरम्यान, या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना निमंत्रित न केल्याने शिवानी वडेट्टीवारांनी समर्थकांसह थेट दिल्ली गाठली आहे. त्यामुळे वडेट्टीवार विरूध्द धानोरकर वाद आता दिल्लीत पोहचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे. याच आढावा बैठकीचा एक भाग म्हणून चेन्नीथला यांनी शनिवारी चंद्रपूर लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणारे कॉग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड.अभिजित वंजारी, शिक्षक मतदार संघाचे कॉग्रेस समर्थित अपक्ष आमदार सुधाकर अडबाले, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार यांना मुंबईत बोलविले होते.

हेही वाचा…अकोलेकरांच्या नावावर ‘वंचित’चा ‘मविआ’वर निशाणा, पुन्हा फलकबाजी करण्यामागचा उद्देश काय?; कटुता वाढणार?

वणीचे माजी आमदार कासावार सोडले तर या बैठकीला जिल्ह्यातील चारही आमदार व माजी मंत्री मोघे उपस्थित होते. चेन्नीथला यांनी प्रत्येक आमदाराशी एकट्यात पाच मिनिटे चर्चा केली. तसेच लोकसभा मतदार संघातील सद्या परिस्थिती, सामाजिक तथा जातीय समिकरण आणि भाजपाची तयारी व संभाव्य उमेदवार अशी माहिती जाणून घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुक जिंकायची असेल तर चारही आमदारांनी बहुजन, ओबीसी किंवा कुणबी समाजाचा उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी चेन्नीथला यांच्याकडे केली.

सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात बाहेरच्या लोकसभा मतदार संघातील नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र बाहेरचा उमेदवार लादू नये, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातीलच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेत स्थानिक उमेदवारच दिला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. संभाव्य घडामोडी बघता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवानी वडेट्टीवार यांनी समर्थकांसह दिल्ली गाठली आहे. तिथे काँग्रेस नेते मुकूल वासनिक, काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खारगे यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. वडेट्टीवार एकीकडे दिल्लीतून प्रयत्न करित असतांना चंद्रपूर लोकसभेच्या बैठकीचे निमंत्रण त्यांना देण्यात आले नाही अशीही माहिती आहे.

हेही वाचा…भंडारा-गोंदियातून उमेदवार कोण? एकच चर्चा

काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने लोकसभेची उमेदवारी आता दिल्लीतून नाही तर मुंबईतूनच ठरणार असल्याचे लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुंबईतील बैठकीनंतर वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर या १२ मार्च रोजी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. एकूणच वडेट्टीवार विरूध्द धानोरकर यांचा वाद विकोपाला गेला असून लोकसभा उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani wadettiwar went to delhi with supporters for chandrapur lok sabha candidature pratibha dhanorkar her competitor in congress rsj74 psg
First published on: 10-03-2024 at 18:37 IST