संजय मोहिते

बुलढाणा: जिल्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अखेर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंगणेंच्या या निर्णयाने केवळ पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षातही खळबळ उडाली आहे.

आज शुक्रवारी दुपारी ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आमदार शिंगणे यांनी मनमोकळेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली. केवळ आणि केवळ बिकट परिस्थितीतील जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी आपण अजित पवारांसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांबद्दल आदर असतांनाही, अपरिहार्य स्थितीत शेतकऱ्यांची बँक वाचविण्यासाठी, अगदी मनावर दगड ठेऊन घेतलेला निर्णय या शब्दात त्यांनी आपल्या निर्णयाचे वर्णन केले.

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल परवा शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान अजितदादांनी सोबत येण्याचा प्रस्ताव दिल्यावर जिल्हा बँकेला मदतीची मागणी रेटली. त्यांनी काही तासानंतर ठोस आश्वासन देत जिल्हा बँकेचा प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले. जिल्हा बँक आणि लाखो शेतकऱ्यांचे हित, सहकारी संस्था, सोसायट्या वाचविण्यासाठी बँकेला ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ ही आमची मागणी आहे. ते मिळाले तरच बँक वाचू शकते अन्यथा ती वाचणे अशक्यच आहे. दादांनी तसा शब्द दिला आणि ते शब्द पाळणारे नेते आहेत, यामुळे दादासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिंगणेंनी सांगितले.