यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात प्रचार संपण्यास केवळ आठ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करून १५ दिवस होत आले. मात्र निवडणूक प्रचाराने अद्यापही वेग घेतला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये येथे थेट लढत होत असली तरी या दोन्ही उमेदवारांना स्टार प्रचारकाच्या सभेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

या मतदारसंघात महायुतीच्या राजश्री हेमंत पाटील व महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. या दोन्ही उमदेवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी काही मोठे नेते जिल्ह्यात आले होते. त्यानंतर अद्याप एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. त्यामुळे उमेदवार स्वत:च लोकसभेची खिंड लढवत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…चंद्रपुरात काँग्रेसच्या केवळ दोन प्रचारसभा; भाजपकडून दिग्गज नेते, अभिनेते-अभिनेत्री…

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार गटाचे आ. रोहित पवार यांची सभा झाली. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळात सभा घेतली. त्यानंतर शिंदे गेल्या आठवड्यात १२ एप्रिलला पुन्हा एकदा यवतमाळात आले व त्यांनी येथे एका हॉटेलमध्ये राजश्री पाटील यांच्या समर्थनार्थ विविध घटकांशी संवाद साधत आढावा घेतला. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पुसद, वाशीम परिसरात काही सभा घेतल्या. अभिनेता गोविंदा याने यवतमाळ, वाशीम, पुसद, कारंजा, मानोरा आदी ठिकाणी रोड शो केले. मंत्री संजय राठोड हे दोन्ही जिल्ह्यात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. भाजपचे सहाही आमदार प्रचारास लागले आहेत. शिवाय विधान परिषद सदस्य राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनीही राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.

महायुतीत स्थानिक पातळीवर सर्व नेते प्रचारात गुंतले. परंतु, राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक अद्यापही प्रचारार्थ मतदारसंघात उतरले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे सुद्धा एकाकी खिंड लढवत आहेत. त्यांची उमेदवारी दाखल होण्यापूर्वी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात चार सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. मात्र तेव्हा महायुतीचा उमेदवारही घोषित झाला नव्हता.

हेही वाचा…विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?

आता महायुतीच्या उमेदवारामागे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सात सत्ताधारी आमदार अशी बलाढ्य प्रचार यंत्रणा असताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार स्वत:च्या बळावर सुरू आहे. शिवसेना उबाठाचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही हिरीरीने प्रचारात सहभागी दिसत नाही. प्रचार संपण्यास अवघे आठ दिवस शिल्लक असताना मोठ्या नेत्याची, स्टार प्रचारकाची एक तरी जंगी सभा व्हावी यासाठी दोन्ही उमदेवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा…बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण

पुढील आठवडा स्टार प्रचारकांचा?

येत्या १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर येथे प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमदेवारासाठी २२ एप्रिलला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथे सभा होणार असल्याची माहिती आहे.