नागपूर : राज्य सरकार व खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून काटोल तालुक्यातील सातनवरी येथे ‘स्मार्ट डिजीटल व्हिलेज’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असून त्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ग्रामीण भारताच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून राज्यात अशाच प्रकारचे ३,५०० प्रकल्प सुरू केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, “हा प्रयोग केवळ डिजिटल गाव उभारणी नसून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. २०४७पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात ग्रामीण विकास हीच खरी किल्ली आहे. म्हणूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील १० गावे असे मिळून ३५०० स्मार्ट ‘डिजिटल व्हिलेज’ उभारले जातील. नागपूर जिल्ह्याने या प्रवासाची सुरुवात केली असून, महाराष्ट्राच्या विकासाचा हा नवा अध्याय आहे.”

कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक महामुनी, सरपंच वैशाली चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकल्पामुळे मिळणाऱ्या सुविधा

कृषी क्षेत्रात माती परीक्षणासाठी आयटी साधने, ड्रोनद्वारे पिकांची निगराणी, हवामानाचा अंदाज व बाजारभावाची त्याच वेळची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर दिली जाईल. शिक्षण क्षेत्रात डिजिटल पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट वर्गखोली, ऑनलाईन शिक्षण व स्मार्ट अंगणवाडीची तरतूद असेल. आरोग्य क्षेत्रात प्रत्येक ग्रामस्थासाठी ई-हेल्थ कार्ड, मोबाईल क्लिनिक, टेलीमेडिसिन सेवा व आरोग्य माहितीची डिजिटल नोंदणी केली जाणार आहे. वाय-फाय सक्षम ग्रामपंचायत, ऑनलाईन अर्ज-सेवा, डिजिटल रेशन कार्ड व पारदर्शकता आणण्यासाठी डेटा डॅशबोर्डची सुविधा असेल.