बुलढाणा : साप असा नुसता शब्द उच्चारला तरी मनात भीती निर्माण होते. त्यात हा दोन अक्षरी प्राणी समोर आला तर भल्या भल्यांची भीतीने गाळण उडते. नाग किंवा अन्य विषारी साप निघाला तर ते घरच काय अख्खे गाव घाबरते. त्यात कमी दर्शन होणारा अजगर जर दिसला तर जास्तच भीती वाटते. मात्र खरेखूरे सर्पमित्र निस्वार्थपणे जीवाचा धोका पतकरून त्या सापाचा जीव तर वाचवितातच पण शेकडो नागरिकांना भयमुक्त करतात.
सर्पमित्र कधी कधी जीवाचा धोका स्वीकारत सापाची सुटका करतात. काही अश्याच सर्पमित्रांनी जीवावरचे धाडस केले. तब्बल ७० फूट खोल विहिरीत उतरून त्यांनी एका अजगराचा जीव वाचविला. यात वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यानेही हातभार लावला. त्यांची निःस्वार्थ कर्तव्यनिष्ठा पाहून गावकरी देखील भारावून गेल्याचे दिसून आले. बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर येथील शिवाजी कड यांच्या शेतातील तब्बल ७० फुट खोल विहिरीत साडेसहा फुट लांबीचा आणि १२ किलो वजनाचा महाकाय अजगर उदमांजर व तिचे पिल्ले खाण्यासाठी गेला होता.शिकार केल्यानंतर तो सुस्त होऊन विहिरीत पडला. दरम्यान शिवाजी कड यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले .सर्पमित्रांनी जीव धोक्यात घालून या अजगराला जीवदान दिले आहे.
शिवाजी कड यांना हे दृश्य दिसून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ व वन विभागाचे कर्मचारी खान तसेच सर्पमित्र, पवन मुळे प्रथमेश शिरसाठ घटनेबद्दल माहिती देऊन पाचारण केले. सर्पमित्रांनी खोल विहिरीत उतरून अजगराला सुरक्षित पकडले. जीवदान मिळालेल्या या अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला सुरक्षित वन विभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले आहे.