अकोला : समाज माध्यमांवर रिल्स व लाईक्ससाठी वाटेल ती पातळी गाठण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्पमित्रांना देखील समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्याचा मोह आवरता आलेला नाही. जीवदान देण्याच्या गोंडस नावावर सर्पमित्रांकडून पकडलेल्या सापांचे छायाचित्र व चित्रफित काढण्यासाठी बीभत्स प्रदर्शन केले जाते. हा धक्कादायक प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे ते सर्प मित्र की शूत्र? असा प्रश्न निर्माण होतो. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार सापांना हाताळणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे गुन्हा असतांना वन विभागाकडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
साप हा शब्द उचारला तरी अंगावर काटा येतो. मानवी जीवासाठी सर्पदंश जीवघेणा ठरू शकतो. राज्यात विषारी व बिनविषारी साप सर्वत्र आढळून येतात. पूर्वी भीतीमुळे सापांना मारले जात होते. गेल्या काही दशकांपासून जनजागृतीमुळे सापांना मारण्याऐवजी त्यांना सर्पमित्रांद्वारे पकडून जंगलात सोडण्याकडे कल वाढला आहे.
साहसी प्रकार म्हणून सर्पमित्र होण्याकडे तरुणाई आकर्षित होते. आता गल्लो-गल्ली सर्पमित्र तयार झालेत. विशेष म्हणजे सर्पमित्र होण्यासाठी त्यांनी कुठलेही अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नसते. केवळ पाहणी करून सरावाद्वारे ते विषारी व बिनविषारी सापांना पकडण्याचे साहस करतात. हे साप पकडल्यावर त्याची चित्रफित व छायाचित्र काढण्यासाठी बीभत्स प्रदर्शन केले जाते.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील तरतुदीनुसार साप पकडणे, त्यांची आश्रय स्थळे नष्ट करणे, इजा पोहोचवणे, बाळगणे, हाताळणे, खेळ किंवा प्रदर्शन करणे याला सक्त मनाई आहे. या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्यास तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
समाज माध्यमांवर टाकून प्रसिद्धी मिळवण्यासाठी सर्पमित्रांचा हा सर्व खटाटोप असतो. निष्काळजीपणे सापांचे प्रदर्शन करतांना विषारी सर्पदंशामुळे सर्पमित्रांचे जीव गेल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, तरी देखील राज्यातील सर्ममित्रांकडून असे विक्षिप्त प्रकार चांगलेच वाढल्याचे दिसून येते.
मात्र, वनविभागाकडून याची कठोरपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. अपवाद वगळता कारवाई झालेली नाही. त्यामुळे हौशी सर्पमित्रांचे चांगलेच फावते. सापांचा सर्रासपणे खेळ व प्रदर्शन सर्वत्र होत आहे. याकडे वन विभागाची होणारी डोळेझाक सापांसह मानवाच्या देखील जीवावर उठली.
माहिती घेऊन कारवाई करू
सापांचा खेळ करणे, प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सर्पमित्रांनी याप्रकारे कृत्य करणे अपेक्षित नाही. या प्रकरणांमध्ये माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी व्यक्त केली.
कायद्याने गुन्हा
साप पकडल्यानंतर त्याची स्टंटबाजी करणे अयोग्यच आहे. सापांचे संरक्षण व संवर्धनासाठी ते पकडून जंगलात सोडले पाहिजे. पकडलेल्या सापांचे चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो, असे मानद वन्यजीवरक्षक तथा ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी सांगितले.