एका कर्मचाऱ्याला फावडय़ाने मारले ’ पाटीलपुरा, गंजीपेठ येथील घटना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील पाटीलपुरा, गंजीपेठ परिसरात सोमवारी दुपारी १२ वाजता वीजचोरी पकडायला गेलेल्या एसएनडीएलच्या पथकावर संतप्त जमावाने अचानक हल्ला केला. पोलीस संरक्षणात एका कर्मचाऱ्याला फावडय़ाने तर इतरांना लाथाबुक्क्याने मारहाण झाली. दरम्यान, घटनास्थळी दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरात गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा वीजचोरी पकडणाऱ्या पथकावर पोलीस संरक्षण असताना हल्ला झाल्याने येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहे.

विजय पराते असे फावडय़ाने मारहाण झालेल्या तंत्रज्ञाचे तर धर्मेद्र पाटील आणि भवानी प्रसाद चौबे असे लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांची नावे आहे. एसएनडीएलकडून शहरातील विविध भागात वीजचोरी पकडण्याचे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत सोमवारी दुपारी १२ वाजता एक दक्षता पथक पोलिसांच्या संरक्षणात पाटीलपुरा, गंजीपेठ येथील अतिकूर रहमान अजिपूर रहमान आणि जियाऊर रहमान अजिपूर शेख या ग्राहकांच्या मीटर तपासणीकरिता गेले. मीटरमध्ये बारिक तारेच्या मदतीने वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. पथकाने घरातील महिलांना माहिती देत त्यांची तपासणी अहवालावर स्वाक्षरी घेतली.

व्हिडिओ रेकॉर्डिगमध्ये होणाऱ्या कारवाईची माहिती इरफान काजीसह शेजारच्यांना कळताच घटनास्थळी मोठा जमाव जमला. एकाने शेजारी पडलेला फावडा घेत विजय पराते या कर्मचाऱ्याच्या पाठीवर मारला. हा कर्मचारी खाली पडताच त्याच्यासह धर्मेद्र पाटील व भवानी प्रसाद चौबे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. जमाव भडकल्याचे बघत तातडीने गणेशपेठ पोलिसांना सूचना दिल्या गेली. दरम्यान, पाच दिवसात दुसऱ्यांना एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांची संघटना संतापली आहे. त्यांनी सोमवारी घटनेच्या दरम्यान पोलिसांकडून वाचवण्याचे प्रयत्नच झाले नसल्याचा आरोप केला. तेव्हा प्रशासन कर्मचारी सुरक्षेकरिता केव्हा पावले उचलणार? हा प्रश्न कामगार संघटनेने उपस्थित केला आहे. विजय पराते यांना तातडीने उपचाराकरिता प्रथम मेयो व तेथून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याला चांगलाच मार लागल्याचे एसएनडीएलचे म्हणणे आहे.

पथकाच्या वाहनाची तोडफोड

एसएनडीएलच्या पथकावर जमावाने हल्ला करताच घटनास्थळी दगडफेकही झाली. याप्रसंगी एसएनडीएलचे पथक आलेल्या वाहनाचे काच फोडण्यात आले. एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांचे शर्ट फाडत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असताना पथकातील पोलीस दिसेनासे झाल्याचा आरोप  एसएनडीएलच्या कामगार संघटनेने केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sndl vigilance team went to prevent electricity theft attacked
First published on: 25-07-2017 at 03:23 IST