नागपूर : कर्करुग्णांचा अखेरचा प्रवास कमीतकमी वेदनादायी व्हावा, यासाठी नागपूरमधील ‘स्नेहांचल’ ही संस्था गेल्या दीड दशकापासून कार्यरत आह़े  रुग्णसंख्येचा मोठा भार पेलणाऱ्या या संस्थेला दानशूरांकडून मदतीचा आधार हवा आह़े

नागपूर शहरातील इमामवाडा परिसरात पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत ‘स्नेहांचल’ कार्यरत आहे. नागपूरच नव्हे, तर विदर्भ आणि मध्य भारतातील कर्करुग्णांना ‘स्नेहांचल’च्या शुश्रूषा केंद्राचा मोठा आधार मिळाला आह़े  उपचार संपल्यानंतर मृत्यूच्या प्रतीक्षेतील रुग्ण या केंद्रात दाखल होतात़  रुग्णांच्या जखमा स्वच्छ करण्यापासून ते त्यांना खाऊ घालण्यापर्यंतची सेवा या केंद्रात केली जाते. दीड दशकात हजारो रुग्णांच्या वेदनांवर या संस्थेने मायेची फुंकर घातली़ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसेंदिवस या केंद्राकडे रुग्णांचा ओघ वाढत आह़े  केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांच्या सुविधेत तडजोड करायची नाही आणि येणाऱ्या नव्या रुग्णांना परत पाठवायचे नाही, असे संस्थेचे धोरण आह़े इमारतीच्या विस्ताराचीही आवश्यकता आह़े  केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांव्यतिरिक्त घरी असणाऱ्या रुग्णांची काळजी, झोपडपट्टय़ांमधील केंद्रावर येणारे रुग्ण, त्यांच्यावरील उपचाराचीही जबाबदारी संस्थेवर आह़े  शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय हा वाढणारा डोलारा सांभाळणे संस्थेला कठीण होत आहे. हा भार हलका करण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आह़े