|| मंगेश राऊत

तीन महिन्यांपासून कारवाई थंडबस्त्यात :- सामाजिक सुरक्षा विभागातील (एसएसबी) एका कर्मचाऱ्याने लाच स्वरूपात मुलीची मागणी केल्यानंतर संपूर्ण विभागच कोमात गेला आहे. पोलीस आयुक्तांनी नेमलेले नवीन एसएसबी पथक कूचकामी ठरत असून गेल्या तीन महिन्यांपासून देहव्यापार व तत्सम कारवाया थंडबस्त्यात गेल्या आहेत. एकप्रकारे एसएसबी कोमात असल्याने शहरात देहव्यापार जोमात सुरू असून गरीब व गरजू मुलींची पिळवणूक सुरू आहे.

शहरात स्पा आणि सलूनच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात देहव्यापाऱ्याचे अड्डे चालतात. त्यांच्यावर कारवाई करून गरीब व गरजू मुलींची सुटका करण्यासाठी पोलीस दलात एसएसबी ही विशेष शाखा आहे. देहव्यापार करणाऱ्या गरीब व गरजू मुलींना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात ओढतात. एकदा दलालाच्या जाळ्यात अडकल्यानंतर मुलींची सुटका होणे कठीण असते. अशावेळी एसएसबीकडून दलालांवर कारवाई करून मुलींची सुटका केली जाते. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महिला सुधारगृहात ठेवण्यात येते. यामुळे अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचते. पण, एसएसबीमध्ये कार्यरत असताना दामोदर संपतराव राजूरकर (५६) व हवालदार शीतलाप्रसाद रामलखन मिश्रा (५१) यांनी एका दलाल महिलेकडे लाच म्हणून तीन मुलींची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होती. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ४ सप्टेंबर एसएसबीचे पथकच बरखास्त केले. त्यानंतर काही दिवसांमध्ये नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून एसएसबी पथक तयार करण्यात आले.

एसएसबीचे पथक कार्यान्वित झाल्यानंतर इतके दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. हा प्रकार देहव्यापाऱ्यातील दलालांच्या पथ्यावर पडला असून त्यांचा अनैतिक व्यवसाय शहरात जोमात सुरू आहे.

सट्टेबाजही एसएसबीच्या संपर्कात

एसएसबीमध्ये असताना आधी काही अधिकाऱ्यांनी देहव्यापारातील दलालांशिवाय शहरातील अवैध दारू विक्रेते, जुगार व मटका, सट्टेबाजांवर छापे टाकून कारवाई केली होती. त्याची दहशत अजूनही सट्टेबाज व अवैध दारू विक्रेत्यांमध्ये आहे. एसएसबीच्या नवीन पथकाने जुन्यांप्रमाणे कारवाई करू नये, यासाठी एसएसबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करून चिरीमिरी देऊ करीत आहेत.

लवकरच आढावा घेणार

ती विवादास्पद घटना घडल्यानंतर एसएसबीचे पथक बरखास्त करण्यात आले होते. आता नवीन पथक नेमण्यात आले असून त्यांच्याकडून अद्याप का कारवाई करण्यात येत नाही, यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांना देहव्यापारावर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाईचे आदेश देण्यात येतील. – नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.