नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कार्यरत डॉ. विक्रांत आकुलवार यांच्या १६ महिन्यांच्या विहानला ‘स्पायनल मस्कुलर अॅट्रोफी’ (एसएमए) हा दुर्मिळ आजार आहे. या आजारावरील उपचारासाठी १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज असून त्यासाठी डॉ. विक्रांत यांची धडपड सुरू आहे. या मुलासाठी आता अभिनेते सोनू सूद आणि अभिषेक बच्चनसह इतरही सेलिब्रेटी सरसावले आहेत. त्यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, ‘लोकसत्ताने’ याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.
करोनाच्या कठीण काळात गरजूंच्या मदतीसाठी धावणाऱ्या अभिनेता सोनू सूदसह अभिषेक बच्चन, कुमुद मिश्रा, नागपूरचा फिल्मफेअर पुरस्कार विजेता अभिनेता ऋतुराज वानखेडे, सुमित व्यास, मराठी चित्रपट अभिनेत्री रसिका सुनील, शुभांगी लाटकर, टीव्ही कलाकार गुंजन उत्रेजा या लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्रींनीदेखील लहानग्या विहानसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता रणवीर शौरी, मनोज बाजपेयी यांनीही विहानच्या मदतीसाठी रिट्विट केले आहे.
१६ महिन्यांचा विहान ‘एसएमए’ या दुर्मिळ अनुवांशिक विकाराने ग्रस्त आहे. ‘झोलजेन्स्मा’ नावाचे इंजेक्शन या आजारावर एकमात्र उपचार असून त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे. शिवाय, हे औषध रुग्णाला विशिष्ट वयाच्या आत देणे गरजेचे असते. विहानच्या पालकांनी ही रक्कम उभारण्यासाठी इतर स्रोतांबरोबरच ‘क्राऊड फंडिंग’चा पर्याय निवडला. या माध्यमातून आतापर्यंत एक चतुर्थाश निधी प्राप्त झाला. विहानच्या पालकांनी सर्व सेलिब्रिटींचे व ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले आहे.
‘एसएमए’ म्हणजे काय?
स्पायनल मस्कुलर ?ट्रोफी (एसएमए) हा एक अनुवांशिक आजार आहे. हा आजार मुलांचे स्नायू कमकुवत करतो. या आजारामुळे शरीरातील एखादी नव्र्ह पेशी निकामी झाल्यास शरीराचा तो भाग पुन्हा सुधारणे कठीण असते. पायात कमकुवतपणा, श्वासोच्छ्वासाचा त्रास आणि आधाराशिवाय बसता किंवा उभे न राहता येणे, अशी लक्षणे विहानमध्ये दिसून आली आहेत.
