देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर : नवाब मलिक यांच्या आरोपांवर मी केलेले ट्विट  बोलके आहे. या आरोपानंतर आशीष शेलार यांची  प्रतिक्रियाही आली आहे. त्यामुळे मी मलिक यांच्या आरोपाला फारसे महत्त्व देत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  केले. बुधवारी दुपारी नागपुरात आले असता ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

एसटी महामंडळाच्या संपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची एसटी महामंडळाबाबत भूमिका अंसेदनशील आहे. सरकार आंदोलक कर्मचाºयांवर कारवाई करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.  भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी  कर्मचाºयांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारने   या आंदोलनाची दखल घेत  मागण्या कशा मंजूर होतील या दृष्टीने चर्चा करत संप संपवला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. लवकरच  बैठक घेऊन त्यात भाजपचे उमेदवार कोण असतील याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

किरीट सोमय्यांना समन्स 

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांविरुद्ध काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी  न्यायालयाने सोमय्यांना समन्स बजावला आहे. राज्य सरकार वसुली करते, हा वसुलीचा पैसा  शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ४० टक्के तर काँग्रेस २० टक्के असा विभागला जातो, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा करीत लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे. लोंढे यांनी त्याचे वकील सतीश उके यांच्यामार्फत सोमय्या यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी अशा दोन याचिका दाखल केल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला  असून सोमय्यांनी स्वत: हजर रहावे अथवा वकिलामार्फत आपली बाजू मांडावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

माझ्यावरील गुन्हे राजकीय –  मुन्ना यादव

मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा दहा वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळे माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड आहे असा होत नाही, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे  माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी दिले. मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा असलेले पद कसे दिले, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. त्यावर   मुन्ना यादव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.