अमरावती : मोर्शी ते अमरावती मार्गावर एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षीय बालक जागीच ठार झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. ही घटना डवरगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी घडला. अन्वित पंकज वलगावकर (५) रा. अंतोरा आष्टी, जि. वर्धा असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डवरगाव येथे महामार्ग रोखून दीड तास रास्ता रोको केले. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा – दुडुदुडू धावणाऱ्या कासवांच्या पाठीवर उपग्रह; समुद्रातील भ्रमणमार्ग शोधण्याचा प्रयत्न

वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे पत्नी कविता आणि मुलगा अन्वित यांच्यासह आपल्या दुचाकी क्र. एमएच ३२/ एक्यू ६११० ने अमरावती येथे काही कामानिमित्त येत असताना मागून येणाऱ्या वरूड ते अमरावती (एसटी क्र.एमएच ०६/ एस ८९५९) बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये समोर बसलेला अन्वित एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला, तर पंकज आणि कविता दोघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनेनंतर डवरगाव येथील संतप्त नागरिकांनी क्षणातच महामार्ग बंद केला.

हेही वाचा – चंद्रपूर : लग्नसोहळ्यातून नववधूचे तब्बल २० तोळे सोने लंपास, विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डवरगाव येथील महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून, या ठिकाणी गतिरोधक बसवावे या मागणीसाठी शेकडो निवेदने प्रशासनाला देण्यात आली आहे, मात्र प्रशासनाने काहीच हालचाली न केल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला. माहुली जहागीर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करू, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.