नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडताच बैद्यनाथ चौकातील ‘स्टारलिंक ट्रॅव्हल्स कंपनी’चे कार्यालय शनिवारी सकाळपासूनच बंद होते. कार्यालयाची तोडफोड होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांचाही बंदोबस्त बैद्यनाथ चौकात होता.

विदर्भ ट्रॅव्हल्सची बस ही शुक्रवारी दुपारी चार वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर बसमधील ३३ प्रवाशांपैकी २५ जणांचा मृत्यू झाला तर आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच बैद्यनाथ चौकातील ‘स्टारलिंक ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी कुलूप लावले आणि पसार झाले. काही नातेवाईकांनी सकाळीच ‘स्टारलिंक ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयात सकाळपासून एकही कर्मचारी नव्हता. दुपारपर्यंत कार्यालय बंद होते, त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

नातेवाईकांची अपघातस्थळाकडे धाव

नागपुरातून विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई हे प्रवासी बसले होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. सकाळी दहापर्यंत काही प्रवाशांच्या कुटुंबियांना अपघाताबाबत माहिती नव्हती. मात्र, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिंदखेड राजा येथे पोहोचण्यासाठी धावपळ केल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.