नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारुपाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. शनिवारी दुपारनंतर महापालिका आयुक्त अधिकृतणे याबाबत माहिती देणार आहेत.मात्र तत्पूर्वी प्रभाग रचनेचे प्रारुप उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार एकूण प्रभागाची संख्या ३८ आहे. २०२२ मध्ये केलेल्या प्रभाग रचनेच्या आधारावरच ही नवी रचना असून त्यात काही प्रमुख बदल करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकांसाठीची पूर्व तयारी राज्यभर सुरू आहे. त्यानुसार ती नागपूरमध्येही करण्यात आली. निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा मसुदा प्रशासनाने तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्याला आयोगाने मंजुरी दिली. ती शुक्रवारी जाहीर होणे अपेक्षित होते.पण महापालिका आयुक्तांनी त्यासाठी शनिवारचा मुहूर्त ठरवला. त्यानुसार तो आज दुपारनंतर जाहीर केला जाणार आहे. महापालिका निवडणूक लढवणारे सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार या सर्वांचे लक्ष प्रभाग रचना कशी असेल याकडे लागले होते. शनिवारी सकाळी प्रभाग रचनेचा मसुदा बाहेर आला. त्याचे अवलोकन केले असता २०२२ मध्ये जी रचना करण्यात आली होती व नंतर निवडणुका पुढे ढकलल्याने ती तशीच ठेवण्यात आली होती. त्यात किंचितसा बदल करून नवी रचना तयार करण्यात आली आहे.

अशी आहे प्रभाग रचना

महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या प्रभाग रचनेत एकूण ३८ प्रभाग आहेत. ३७ प्रभागात एकूण चार वॉर्डाचा समावेश असून एक प्रभाग ३ वॉर्डाचा आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रभागरचना करण्यात आली आहे. नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाखांवर असल्याने प्रभाग रचना करताना मतदारांच्या संख्येचे प्रभागनिहाय विभागणी करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे प्रारुपाचे अवलोकन केले असता दिसून येते. साधारणपणे प्रत्येक वॉर्ड हा ६० ते ७० हजार लोकसंख्येचा आहे. ही संख्या लक्षात घेता एका प्रभागात सरासरी २ लाख ८० हजार लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. एक प्रभाग म्हणजे छोटा विधानसभेचा मतदारसंघच झाला आहे. इच्चुकांना प्राचारासाठी मोठी पायपीट करावी लागणार आहे. तसेच मतदानासाठी यंत्रणा सज्ज करताना प्रशासनाचीही मोठी तारेवरची कसरत होणार आहे.