महेश बोकडे
नागपूर : येथे राज्यस्तरीय जनुकीय चाचणी प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे येथे विविध भागांतील सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञांसह तंत्रज्ञांनाही जनुकीय चाचणीचे प्रशिक्षण मिळेल. केंद्राने राज्यात प्रत्येकी एक केंद्र स्थापण्याचे निश्चित केले आहे. महाराष्ट्रात नागपूर एम्सला हे केंद्र असेल. या केंद्रात महाराष्ट्रासह जवळच्या राज्यातील सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञांसह या क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञांनाही अद्ययावत जनुकीय चाचणीचे प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे नागपूर एम्सचे महत्त्व देशात वाढणार असल्याची माहिती एम्सच्या संचालिका मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
आठवडय़ात ५० नमुन्यांची चाचणी
एम्सला देणगीतून मिळालेल्या जनुकीय चाचणी यंत्राच्या एक वर्षांच्या देखभाल आणि दुरुस्तीसह किट्स व रसायनाचा खर्च ‘पॅथ’ संस्थेकडून केला जाणार आहे. या यंत्रावर आठवडय़ाला एकाच वेळी ५० नमुन्यांची चाचणी शक्य असल्याचेही डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले. करोना कमी झाल्याने जनुकीय चाचणीसाठी नमुने कमी मिळतील. परंतु एम्सला कार्यान्वित होणारे जनुकीय चाचणी यंत्र अद्ययावत असल्याने त्यावर क्षयरोग, टय़ुमरसह इतरही
वेगवेगळय़ा प्रकारच्या महत्त्वपूर्ण चाचण्या होतील. त्यातून नवनवीन संशोधनासह रुग्णांवर अचूक उपचारासाठी मदत होईल.
– प्रा. डॉ. मीना मिश्रा (वाजपेयी), विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, एम्स, नागपूर