अमरावती: तिरूपती बालाजी हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. विविध सणांनिमित्त भाविकांची गर्दी वाढते. राज्यातील अनेक शहरांमधून तिरूपती येथे जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असली, तरी भारतीय रेल्वेतर्फे विशेष एक्सप्रेस गाड्या देखील चालवण्यात येत आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आता दररोज तिरूपतीसाठी रेल्वेगाडी उपलब्ध आहे. गाडी क्रमांक १२७६६ अमरावती-तिरूपती ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस भाविकांसाठी उपलब्ध आहे. ही गाडी अमरावतीहून दर सोमवार, गुरूवारी धावते, तर परतीसाठी १२७६५ ही गाडी मंगळवार, शनिवारी धावते.
गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरूपती या गाडीला २ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी ८.१० वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून सुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता ती तिरूपतीला पोहचते. परतीसाठी दर शनिवारी तिरूपतीहून दुपारी १२.३० वाजता सुटते आणि अकोल्याला दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता पोहचते.
गाडी क्रमांक ०७०१५ नांदेड-तिरूपती ३१ ऑगस्टपर्यंत धावणार असून दर शनिवारी दुपारी ४.५० वाजता नांदेडहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता तिरूपतीला पोहचते. गाडी क्रमांक ०७०१६ तिरूपती नांदेड ही गाडी १ सप्टेंबरपर्यंत धावणार असून दर रविवारी दुपारी ४.४० वाजता तिरूपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता नांदेड येथे पोहचते.
गाडी क्रमांक ०७१८९ नांदेड- तिरूपती ३० ऑगस्टपर्यंत धावणार असून शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता नांदेडहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता तिरूपतीला पोहचते. गाडी क्रमांक ०७१९० तिरूपती-नांदेड १ सप्टेंबरपर्यंत धावणार असून दर शनिवारी दुपारी २.२० वाजता तिरूपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नांदेडला पोहचते.
आणखी एक विशेष गाडी
प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी तिरूपती-साईनगर शिर्डी- तिरूपतीदरम्यान विशेष गाडीच्या १८ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०७६३७ तिरूपती-साईनगर शिर्डी ही गाडी ऑगस्टमध्ये ३,१०,१७,२४ आणि ३१ तारखेला सप्टेंबरमध्ये ७, १४, २१ आणि २८ तारखेला दर रविवारी सकाळी ४ वाजता सुटेल आणि सोमवारी शिर्डी येथे सकाळी १०.४५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी-तिरूपती ही गाडी शिर्डी येथून ऑगस्टमध्ये ४,११,१८ आणि २५ तारखेला तर सप्टेंबरमध्ये १,८,१५,२२ आणि २९ तारखेला दर सोमवारी सायंकाळी १९.३५ वाजता सुटेल आणि तिरूपती येथे बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता पोहचेल.