नागपूर : वाघ गावपरिसरात आला म्हणून त्याला दगड मारून हुसकवण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी केला. मात्र, वाघाने हल्ला केला असता तर त्यात गावकऱ्यांचा बळी देखील गेला असता. त्यात त्या वाघाला मग वाघावर हल्लेखोर असा ठपका ठेवून त्याला कायमस्वरूपी जेरबंद करण्यात आले असते. तो वाघ सरळ मार्गाने जात असताना गावकऱ्यांची ही कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, या वाघाला वनखात्याने जेरबंद केले,बसुन अवघ्या २४ तासात त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनखात्याने घेतलेल्या या निर्णयामुळे एक वाघ कायमस्वरूपी जेरबंद होण्यापासून थांबला आणि त्याला त्याचा नैसर्गिक अधिवास परत मिळाला.

दोन दिवसांपूर्वी गोंदिया वनविभागांतर्गत आमगांव वनपरिक्षेत्रातील मौजा कवडी गावात वन्यप्राणी वाघ दिसून आला. या परिसरातील शेतात तो होता. मात्र, वाघ दिसताच गावकरी गोळा झाले आणि त्यांनी वाघाला दगड मारण्यास सुरुवात केली. काही वन्यजीवप्रेमींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यांना वाघाला दगड मारण्यात आनंद येत होता. त्यामुळे चिडलेला वाघ त्यांच्या मागेही धावला. वनखात्याला माहिती होताच वनविभागाची संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसरात निरीक्षण करुन वाघाचा शोध घेतला असता दुपारी अंदाजे १२.३० वाजताच्या दरम्यान वाघ आमगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र अंजोरा नियतक्षेत्र अंजोरा मधील मौजा रामपुर गावाजवळील देवरी-आमगांव राष्ट्रीय महामार्गा लगत रस्त्याच्या कडेला नाल्यामध्ये बसून असल्याचे दिसून आले.

गेल्या सात-आठ दिवसांपासून हा वाघ मानवी वस्ती तसेच शेती क्षेत्रालगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता मुख्य वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव यांच्या पूर्व परवानगीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोंदिया वनविभागाचे जलद बचाव दल व क्षेत्रीय कर्मचारी यांचे कडुन सदर वाघास बेशुध्द करुन यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वाघाची तपासणी करण्यात आली, तपासणीमध्ये वाघ सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले.

उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) गोंदिया, वनपरिक्षेत्र अधिकारी, आमगांव, वनपरिक्षेत्र अधिकारी, उत्तर देवरी, मानद वन्यजीव रक्षक तसेच अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया, सावन बहेकार, पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेंद्र पटेल, पशुधन विकास अधिकारी डॉ. अजींक्य उरकुडे, पशुधन विकास अधिकारी, सचिन कोकोडे, पशुधन विकास अधिकारी, कांतीलाल पटले व क्षेत्रीय वनकर्मचारी यांचे उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.