नागपूर : उपराजधानीत मोकाट श्वानांमुळे अनेकदा नागरिकांना त्रास होतो. इतकेच नाही तर श्वान पाळणाऱ्यांकडूनही दमदाटी केली जाते.पाळलेले श्वान रस्त्यंवरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात चावेही घेतात. वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे नागपूरकरांच्या संतापाची दखल घेत, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सोमवारी तडकाफडकी नियमावली जारी करीत पाळीव श्वान धारकांनाही तंबी दिली आहे.

श्वानांच्या उद्रेकावरून महापालिका आणि पोलीस यंत्रणांवर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी प्राणीप्रेमी आणि प्रशासनाची एकत्र बैठक बोलावत चर्चाही केली होती.त्यावर आता पोलिस आयुक्तांनी श्वानांचा नागरिकांना मन:स्ताप होत असल्यास मालकांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यानियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने श्वानांना वस्त्यांमध्ये फिरवता येणार नाही.अनेकदा पाळीव श्वान इतरांना चावा घेतात. हीच बाब लक्षात ठेवून नागपूर पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी अधिसूचना जारी केली. पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरविताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीची जाळी लावणे अनिवार्य असेल.

सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे.सोमवारी पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत ही नियमावली घालून दिली आहे. अनेक पाळीव श्वानांचे मालक आपल्या प्राण्याचा फिरायला नेताना वाट्टेल तेथे नैसर्गिक विधीसाठी बसवतात. याचा नागरिकांना त्रास होतो. काही श्वानांचे मालक तर त्यांना दरवाजाबाहेर फिरायला सोडून देतात. या श्वानांनी परिसरातील नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना यापर्वीही घडल्या आहेत.

ही बाब लक्षात घेत पाळीव कुत्र्यांना बाहेर नेताना तोंडाला विशिष्ट प्रकारची जाळी लावणे अनिवार्य असेल. श्वानांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही या पद्धतीने जाळी लावावी लागेल. जर जाळीशिवाय कुत्रा आढळला तर त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई होणार आहे. श्वानांच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव व पत्ता अनिवार्य असेल.

सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर श्वनांना खाऊ घालण्यासदेखील मनाई असेल. महापालिकेने घोषित केलेल्या श्वान अन्न पुरवठा ठिकाणीच अन्न पुरवता येईल. इतर कुठेही श्वानांना अन्न दिल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट तसेच पाळीव कुत्र्यांचा उपद्रव दिसून येतो. जर जास्त उपद्रव वाढला तर थेट ११२ वर किंवा मनपा अथवा जवळील पोलीस ठाण्यात फोन करून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.