हिगणा येथील शांती निकेतन उच्च प्राथमिक विद्यालयात शनिवारी सकाळी शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्याने सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यातील २५ विद्यार्थ्यांना िहगणातील ग्रामीण रुग्णालयात तर सुमारे शंभर विद्यार्थ्यांवर नागपूरच्या मेडिकल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मेडिकलमध्ये काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मेडिकलमध्ये रुग्ण वाढल्यावरही डॉक्टर्स न वाढवल्याने प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
िहगण्यातील शांती निकेतन उच्च प्राथमिक विद्यालयात दोन पाळीत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. सातशेहून जास्त विद्यार्थ्यांची शाळा सकाळी व दुपारी भरते. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार नित्याने शालेय पोषण आहारातील खिचडी दिली जाते. शनिवारी सकाळी व दुपारी दोनच्या सुमारास दुसऱ्या पाळीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना खिचडी दिली. काही वेळात विद्यार्थ्यांना उलटय़ा सुरू झाल्या. शिक्षकांनी तातडीने मुख्याध्यापकांना माहिती दिली. सुमारे सव्वाशे मुलांना तातडीने जवळच्या हिंगणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.