नागपूर : शिधा पत्रिका धारकांना राज्य शासनाकडून दिवाळीकरिता जो ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे त्यासाठी शंभर रुपये न आकारता तो पूर्णपणे मोफत दिला जावा, अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर सरकारी स्तरावर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
याबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना ही शिधा वस्तूंची दिवाळी भेट मिळणार आहे. परंतु, त्यासाठी या नागरिकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. ते न मोजता त्यांना हा ‘आनंदाचा शिधा’ मोफत देऊन त्यांची दिवाळी आणखी गाेड करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांना कोटयवधींची कर्जमाफी दिली जाते. ती द्यायलाच हवी, कारण शेतकरी संकटात आहे. परंतु, शेती क्षेत्राच्या परिघाबाहेर असलेल्या कोटयवधी कुटुंबांप्रतीही सरकार बांधील आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंतही हा आनंद पोहोचवता आला पाहिजे.
पाच लाख कोटींवर अर्थसंकल्प असणाऱ्या महाराष्ट्रासाठी १७९ कोटींचा हा खर्च काही मोठा नाही. परंतु, शिधा मोफत दिल्यास जनमानसात सरकारबाबत चांगला संदेश जाईल, अशी भूमिका मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्य सरकारमधील एका मंत्र्यानेच ही लोकाभिमुख मागणी केल्याने सरकारही याबाबत गांभीर्याने विचार करत असून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.