समाजातील विशेष अनाथ बालकांच्या संगोपनाचे अवघड कार्य करून त्यांच्या जीवनात नवप्रकाश आणणाऱ्या सूर्योदय बालगृह संस्थेच्यावतीने शहरात एक अनोखा विवाह सोहळा होत आहे. या लग्न सोहळ्यामागे मूळ पुणेकर दोन बहिणींची हृदयद्रावक कथा आहे. बालगृहात जीवन व्यतीत करणाऱ्या अनाथ मुलीशी सुसंस्कृत व चांगल्या घरातील नवयुवक साताजन्माची लगीन गाठ बांधेल. अनेक दुःख भोगल्यानंतर त्या मुलीच्या जीवनात आनंदी क्षण येणार आहेत.

हेही वाचा >>>प्रकाश आंबेडकर यांचे संघाच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र; म्हणाले, “सरसंघचालकांनी कधी…”

स्व.भैय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेतून स्थापन केलेल्या सूयोदय बालगृहात एच.आय.व्ही.बाधित बालकांच्या सांभाळण्याचे कार्य गेल्या १६ वर्षांपासून केले जाते. या बालकांसाठी विदर्भ-मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यातील हे एकमेव बालगृह आहे. बालगृहात ४० बाधित बालकांचा सांभाळ केला जातो. आश्रमात वास्तव्य करणाऱ्या एका अनाथ मुलीच्या बहिणीचे लग्न लावून देण्याचा उपक्रम बालगृहाने हाती घेतला. सूयोदय परिवाराची सुकन्या हर्षा हिचा शुभविवाह शहरातील चि. रिकीन याच्यासोबत २२ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता सूर्योदय बालगृहात होईल.

हेही वाचा >>>वर्धा : शिक्षकांचा महसूल खात्यास सवाल; म्हणे, “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…”

मूळची पुणेकर हर्षा अनाथ असून तिच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाले. दोघी बहिणी पुण्यातील बालगृहात राहत होत्या. लहान बहिणी नेहमी आजारी पडत असल्याने वैद्यकीय चाचणीमध्ये तिचा एच.आय.व्ही. अहवाल सकारात्मक आला. मोठ्या बहिणीचा अहवाल नकारात्मक होता. लहान बहिणीला पुणे येथील एच.आय.व्ही.बाधितांच्या आश्रमात ठेवण्यात आले. दोन बहिणींची ताटातूट झाली. कालांतराने पुण्यातील आश्रम बंद झाल्याने तिला अकोल्यातील आश्रमात आणण्यात आले. दोन्ही बहिणींच्या मनात भेटीची तळमळ होती. मोठ्या बहिणीचे आश्रमात आडनाव चुकवल्याने तिचा पुण्यात शोध घेणे फारच अवघड झाले. सूयोदय बालगृहाचे समन्वयक शिवराज पाटील यांनी पुण्यातील सर्व आश्रम पालथे घालून मोठ्या बहिणीचा शोध घेतला. तिला अकोल्यात आणून दोन्ही बहिणींची भेट घडवून आणली. मोठ्या बहिणीला आश्रमातच मानधनावर रोजगार देऊन तिचा दोन वर्ष सांभाळ केला. आता तिचा विवाह सुशिक्षित, ‘अकाउंटिंग’चे कार्य करणाऱ्या तरुणासोबत जुळवून आणला. वर रिकीन व त्याच्या आईला एका गरीब व गरजू मुलीच्या जीवनात आनंद पेरायचा होता. याच संकल्पातून हर्षासोबत लग्न करीत असल्याचे रिकीन यांनी सांगितले. या लग्न अनोख्या सोहळ्यासाठी सूर्योदय बालगृहाच्या अध्यक्ष प्रतिभा देशमुख, प्रशांत देशमुख, पंकज देशमुख, विजय देशमुख, शिवराज पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूयोदय परिवाराकडून ११ लग्न
आतापर्यंत सूयोदय बालगृहात राहणाऱ्या १० मुलींचे लग्न परिवाराकडून लावण्यात आले. हे ११ वे लग्न असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी दोन बाधित नसलेल्या मुलींचे लग्न लावण्यात आले. इतर मुली बाधित असल्या तरी ते आनंदी वैवाहिक आयुष्य जगत असून योग्य काळजी घेतल्याने त्यांची मुले बाधित नसल्याचे सांगण्यात आले.