नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहात अनेक संशयास्पद घटना समोर आल्या आहेत. शनिवारी दुपारी मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी असलेल्या आकाश ताराचंद्र गौड (२८, रा. श्रीनगर, नंदनवन) याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचे रविवारी दुपारी न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले असून आकाशच्या कुटुंबीयांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२१ रोजी आकाशने मित्रावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला होता. ऑक्टोबर २०२१ पासून आकाश नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी होता. त्याला आई-वडील आणि भाऊ असून त्यांच्या नेहमी कारागृहात नियमानुसार भेटी होत होत्या. शनिवारी दुपारी आकाशची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

अंगावर जखमा

आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांना त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. आकाशच्या नाकातून रक्तही आल्याचे दिसत होते. त्यामुळे आकाशचा मृत्यू संशयास्पद आहे. त्याला गेल्या दोन दिवसांपासून मारहाण होत होती, अशी चर्चा आहे.

कारागृह पुन्हा चर्चेत

काही दिवसांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या धनाढय़ शेकू खान याच्या बराकीत १३ एप्रिलला मोबाईल सापडला होता. तो मोबाईल एका महिला अधिकाऱ्याच्या परवानगीने शेकूकडे पोहचल्याची मोठी चर्चा कारागृहात होती. आता बंदिवानाच्या संशयास्पद मृत्यूमुळे मध्यवर्ती कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे.

तुरुंग अधिकाऱ्यांची मारहाण आकाश आणि अनिकेत नावाच्या बंदिवानामध्ये गेल्या आठवडय़ात वाद झाला. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर आकाशला एका वेगळय़ा बराकीत ठेवले होते. आकाशला धडा शिकवणे आणि अन्य बंदिवानांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तरुंग अधिकारी आणि रक्षकांनी आकाशला जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप आकाशचे वडील ताराचंद यांनी प्रसारमाध्यमांकडे केला.