कर्मचाऱ्यांवरील कारवाई आकसातून?
निलंबनाचा आदेश मिळाल्याने मानसिक आरोग्य बिघडलेला कर्मचारी अपघातात मृत्युमुखी पडल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या कारवाईविरुद्ध कमालीचा असंतोष निर्माण झाला असून तो पुढच्या काळात अधिक उफाळून येण्याचे संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याचे चार महिन्यांपासून वेतन थकविण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती यासाठी शासनाने नियम ठरवून दिले असले तरी त्यात होणारा राजकीय हस्तक्षेप, अधिकाऱ्यांशी जवळीक आणि अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांप्रती असलेला व्यक्तिगत राग-लोभ याची छाप या प्रक्रियेवर दरवर्षी असते. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून बदल्या अणि पदोन्नतीच्या यादीवर लक्ष टाकले तर तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी बदल्या करताना, कारवाई करताना व्यक्तिगत आकसाला अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा आता कर्मचारी उघडपणे करू लागले आहेत. सावनेर तहसील कार्यालयातील निलंबित कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू हे यासाठी कारण ठरले आहे. सचिन मीत असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या निलंबनासाठी प्रशासनाने २० कारणे दिली होती. ८ जुलैला त्याचा नागपूरमध्ये अपघाती मृत्यू झाला. त्याच दिवशी सकाळी त्याला निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. मीत पूर्वी जिल्हाधिकारी व नंतर सावनेर तालुका कार्यालयात रुजू झाला होता. ज्या टेबलवर त्याला काम करण्याचा आग्रह केला जात होता तेथील कॅशबुक अपडेट करून द्यावे, अशी विनंती त्याने केली होती. त्याची बाजू ऐकून न घेता कारवाई करण्यात आल्याने त्याला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी, अधीक्षक, आणि सावनेर तालुक्यातील संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप आता कर्मचारी करू लागले आहे. खालच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसीची किमान चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाने करणे अपेक्षित होते. संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर तो मानसिक धक्क्यातून सावरला असता, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे बदली आणि पदोन्नत्यांमध्ये झालेल्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांचा संयम संपला आहे. दोन वर्षांपूर्वीपासून एका अधिकाऱ्याच्या सूडबुद्धीच्या कारवाईविरुद्ध आता कर्मचारी उघडपणे बोलू लागले आहेत. अलीकडच्याच काळात खणीकर्म विभागातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई असो किंवा त्यापूर्वी निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यावर झालेली कारवाई असो. करमणूक कर विभागातील एका कर्मचाऱ्याला त्याने महापालिकेतील एका बडय़ा अधिकाऱ्याला विविध करमणूक कार्यक्रमांच्या पासेस वेळोवेळी दिल्या नसल्याने मनात राग ठेवून बदली करण्यात आली. यापूर्वी झालेल्या बदल्यांतील अन्यायाची प्रकरणे पुढे येत आहेत. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला शहरात होणाऱ्या मोठय़ा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पासेस दिल्या नाही म्हणून एका कर्मचाऱ्याची दोन वेळा बदली करण्यात आली. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे न पाठविण्याची कारणेही अधीक्षकांच्या कार्यालयात दडली असल्याचे कर्मचारी बोलू लागले आहेत. अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळायची, दिलेली कामेही वेळेत करायची, अशा दुहेरी संकटाला सध्या कर्मचारी तोंड देत आहेत. अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कर्मचारी थेटपणे बोलू शकत नाही, पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार किती दिवस सहन करायचा, सावनेरच्या कर्मचाऱ्यासारखी स्थिती इतरांवरही येऊ शकते, त्यामुळे आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी देऊ लागले आहे.