नागपूर: राज्यात मागील दोन महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण अचानक वाढले. सणासुदीच्या काळात रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. दरम्यान १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान राज्यात आढळलेल्या एकूण स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णांच्या तुलनेत ७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या संख्येने रुग्ण आढलले आहे. त्यामुळे राज्यात या आजाराच्या रुग्णसंख्या तिपटीहून अधिक झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून हा तपशील समोर आला आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान स्वाईन फ्लूचे एकूण १८३ रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर १ जून ते ७ ऑगस्ट दरम्यान या आजाराचे ४४० रुग्ण आढळले. येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणतात ?

पावसाळ्यातील वातावरणामुळे विषाणूजन्य आजार बळावले आहेत. वेळीच उपचाराने रुग्ण बरे होऊ शकतात. परंतु, सीओपीडी, दमा, हृदयविकार, मूत्रपिंडाच्या रुग्णांनी मात्र वेळीच उपचार न घेतल्यास धोकादायक ठरू शकते, अशी माहिती विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशचे अध्यक्ष व क्रिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी दिली.

स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लूचे रुग्ण कमी असल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. राज्याच्या काही भागात रुग्ण वाढले, परंतु आरोग्य विभागाडून रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, फवारणी, विनाविलंब उपचार, औषधांची उपलब्धता, खासगी व सरकारी डॉक्टरांना प्रशिक्षण, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचा दावाही आरोग्य विभागाने केला आहे.

सर्वाधिक रुग्ण आढळलेली महापालिका व जिल्हे

१ जानेवारी २०२५ ते ७ ऑगस्ट २०२५
……………………………………………………….

महापालिका/ जिल्हे – रुग्ण – मृत्यू
………………………………………………………..

बृहन्मुंबई – २२६ – ००

ठाणे – ८७ – ००

पुणे – १३३ – ००

सोलापूर – ४३ – ००

नागपूर – ४५ – ०१

नाशिक – ०७ – ०१

कोल्हापूर – ५६ – ००
………………………………………………………..

‘स्वाईन फ्लू’ची लक्षणं काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘स्वाईन फ्लू’ हा सामान्य ‘फ्लू’ सारखा असल्याने याची लक्षणं सामान्य तापासारखीच आहेत. या रुग्णामध्ये ताप (१०२ ते १०२ डिग्री), थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, खूप जास्त थकवा येणे, डायरिया, उलट्या होणे, स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.