नागपूर : पावसाळ्यात व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्र पर्यटनासाठी बंद असले तरीही बफर क्षेत्रातील पर्यटनामुळे पर्यटक भलतेच खूश आहेत. किंबहुना अलीकडच्या काही वर्षांपासून कोअरपेक्षा बफर क्षेत्रालाच पर्यटकांची अधिक पसंती आहे. कारण या क्षेत्रात वाघांची संख्याही अधिक आणि येथील वाघ पर्यटकांना कधीच निराश करत नाही. एवढेच नाही तर कायम आठवणीत राहतील अशा वाघांच्या करामतीचे साक्षीदार याच बफर क्षेत्रात होता येते. वाघीण आणि तिच्या बछड्यांमधील असाच एक प्रसंग ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील जुनोना-देवाडा परिसरात पर्यटकांनी अनुभवला. हे दृश्य वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी अलगद टिपले.

मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील एक वाघीण “कॉलरवाली” म्हणून ओळखली जाते होती. भारतातील ही एकमेव वाघीण होती जिने तिच्या संपूर्ण आयुष्यात २९ बछड्याना जन्म दिला. त्यामुळेच तिला “सुपरमॉम” म्हणून सुद्धा ओळखले जात होते. वाघ साधारणपणे १४ ते १५ वर्षाचे आयुष्य जगतो, पण मध्यप्रदेशातील ही “सुपरमॉम” तब्बल १७ वर्षे जगली. अलीकडेच काही वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. तेव्हा परिसरातील गावकरीसुद्धा तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. तिचा वारसा महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “कॉलरवाली” चालवत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

ताडोबातील “लारा” ही वाघीण आणि “वाघडोह” या वाघाची ती मुलगी असल्याचे सांगितले जाते. आता ती देखील मातृत्वाचा अनुभव घेत आहे. तिने जेव्हाही बछड्याना जन्म दिला तेंव्हा तेव्हा तिने बच्चड्यांसहित पर्यटकांसमोर येऊन पर्यटकांना खुश केले. (ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ तसेही कायम पर्यटकांना खुश करतात) ही “कॉलरवाली” वाघीण आणि तिच्या बछड्यांनी आताही पर्यटकांना असेच वेड लावले आहे. यापूर्वी तिने तीन बचड्यांना जन्म दिला होता. तेव्हाही ती तिच्या बछड्यांसह बिनधास्तपणे जंगलातील पर्यटनाच्या रस्त्यावर यायची. तिचे बछडे तिच्यासारखेच बिनधास्त आहेत. त्यांना पर्यटकांशी काहीच देणेघेणे नाही. जंगल त्यांचा अधिवास आणि त्यांच्या या अधिवासात कुणी आले काय आणि गेले काय याने त्यांना काहीच फरक पडत नाही.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील जुनोना-देवाडा या रस्त्यावरून कॉलरवाली वाघीण आणि तिचे बछडे रस्ता ओलांडत असताना त्यातील एकाने भर रस्त्यातच ठाण मांडले. वाघिणीने त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तिने त्याला प्रेमाने चाटले, कुरवाळले, पण तो उठायला तयारच नव्हता. शेवटी त्याला रस्त्यातच बसू देत, वाघीण रस्त्यालगतच्या झुडपात गेली.