यवतमाळ : ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ ही अविश्वसनीय योजना राज्य शासनाने जाहीर केली. राज्यातील महामार्ग गुळगुळीत असताना राज्य, जिल्हा आणि गाव पातळीवरील मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागते. कदाचित नागरिकांच्या या ‘वेदना’ राज्य शासनापर्यंत पोहोचल्या आणि खड्डेमुक्त महाराष्ट्राचा आव्हानात्मक ‘टास्क’ शासनाने स्वीकारला.

रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या लवकरच मिटेल, अशी ही योजना असून त्यासाठी शासनाने ‘पीसीआरएस अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केल्यास पुढील ७२ तासांत बांधकाम विभागाकडून हा खड्डा बुजविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. राज्य शासनाच्या खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने हे ॲप विकसित केले आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेले हे ॲप लवकरच सर्व नागरिकांना वापरासाठी खुले होणार आहे. प्ले स्टोअरवरून नागरिकांना हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येईल.

हेही वाचा – खळबळजनक! १४ पिस्तुल, ८० जिवंत काडतुसे, २५ मॅगझीन जप्त; बुलढाण्यात ठाणे पोलिसांची धडक कारवाई

रस्त्यावरील खड्ड्यांचे छायाचित्र काढून ते या ॲपमध्ये अपलोड करून माहिती भरायची. हा खड्डा कुठल्या मार्गावर आहे, त्या संबंधित बांधकाम विभागाकडे ही तक्रार ऑनलाईन पोहोचणार आहे. त्यानंतर ७२ तासांच्या आत संबंधित खड्ड्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचे छायाचित्र अपलोड करून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यास रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जातील. यामुळे रस्ते खड्डेमुक्त आणि नागरिक वेदनामुक्त होईल, असा विश्वास बांधकाम विभागाला वाटतो!

हेही वाचा – अमरावती: चिखलदरा SKY WALK उभारणीचा मार्ग मोकळा; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲपमध्ये अपलोड झालेल्या छायाचित्रावरून खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांकडून यवतमाळच्या बांधकाम विभागसही प्राप्त झाल्या आहेत. मात्र, हे अ‍ॅप केवळ बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) रस्त्यांसाठी असून नगर परिषद, जिल्हा परिषद, रस्ते प्राधिकरण यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्ड्यांपासून नागरिकांना मुक्ती मिळणार नाही, हे विशेष.