चंद्रपूर : जिवती तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या दुर्गम व आदिवासी परिसर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला दुसरे शिक्षक द्या हो’ म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी भर उन्हात एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केला. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन शिक्षकांची नेमणूक करीत विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे.

शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. वाहतुकीची रहदारी असणारा मार्ग त्यांनी रोखून धरला. दरम्यान, गावचे पोलीस पाटील यांनी टेकामांडवा येथील पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. सहायक उपपोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर हे ताफ्यासह घटनास्थळ गाठून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिवती तालुक्यात ५८ शिक्षकांची रिक्त पदे आहेत. पाटागुडा येथील जि.प. शाळा इयत्ता सातवीपर्यंत असून, ७२ एवढी पटसंख्या आहे. या शाळेतील शिक्षक कधी सुट्टीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसताना देखील सुट्टीवर जातात, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा – अमरावती : जुनी पेन्शन योजना हा आता वैचारिक संघर्षाचा विषय, माजी विधान परिषद सदस्य बी.टी. देशमुख यांचे सरकारला खडेबोल

हेही वाचा – अमरावती : नात्याला काळीमा! चुलत भावाकडून बहिणीचे लैंगिक शोषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटागुडा येथील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. पाटागुडा येथे दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, असे पं.स. जिवती, गटविकासअधिकारी, डॉ. भागवत रेजिवाड यांनी सांगितले.