चंद्रपूर:  दिवंगत बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या परिश्रमतून उभे राहिलेले आनंदवन तथा महारोगी सेवा समिती अमृत महोत्सवी वर्षात आर्थिक अडचणीत सापडली आहे. संस्थेने यावर्षी ७५ वर्ष पूर्ण केली.  पाच वर्षापासून शासनाकडे संस्थेचे चार कोटी रुपये थकीत असल्याने संस्थेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी समाजातील दानशूरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

बाबा व साधनाताई यांनी बचतीचा व योग्य आर्थिक नियोजनाचा संस्कार संस्थेत रुजवला, त्यामुळे संस्थेचे सेवाकार्य गेली ७५ वर्षे सुरळीतपणे पार पडू शकले. परंतु, गत काही वर्षांत जागतिक पातळीवर घडलेल्या घटनांचा  “संस्थात्मक पातळीवर”ही परिणाम झाला आहे.संस्थेच्या ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित १ हजार ५१७  कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार,वृद्ध-अनाथ-परित्यक्ता-मानसिकदृष्ट्या अपंग बांधव आणि त्यांची मुले, विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवासी ३०४ दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी यांचे रोजचे दोन वेळचे जेवण, चहा, न्याहारी, आरोग्यसेवा, निवाससुविधा, वीजबिल, , शैक्षणिक मदत,   या ठळक आणि इतर अनेक  गोष्टींचे नियोजन संस्थेमार्फत करण्यात येते.  त्याचबरोबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य आणि कृषी महाविद्यालये, अनिवासी माध्यमिक शाळा, कृषी-तंत्र विद्यालय यांतील ३ हजार ५६५ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा भार संस्थेला उचलावा लागतो.

हेही वाचा >>>चंद्रपूर : पीएचडीसाठीची गोंडवाना विद्यापीठाची जाचक अधिसूचना रद्द

यासाठी संस्थेला दरवर्षी  २५ कोटी रुपये  निधीची आवश्यकता असते. परंतु, वाढती महागाई , बँकांतील  ठेवींवरील व्याजदरांत झालेली  घट, स्वयंसेवी संस्थांच्या लघुउद्योगांच्या उत्पन्नावर मर्यादा , कुष्ठरूग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी मिळणारे अत्यल्प शासकीय अनुदान, तसेच, दिव्यांग बांधवांच्या निवासी शिक्षण-प्रशिक्षणासाठी मिळणारे अत्यल्प वेतनेतर शासकीय अनुदान आणि सदर अनुदाने मिळण्यात होणारी  दिरंगाई, इत्यादी  समस्यांमुळे  खर्चाशी  ताळमेळ करणेअशक्य झाले आहे.  शासकीय अनुदान, संस्थेने आधी पदरची रक्कम खर्च केल्यानंतर एकूण खर्चाच्या ८०% असे प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होते. संस्थेअंतर्गत येणाऱ्या अंध शाळा, मुकबधीर शाळा व संधीनिकेतन अपंगांची कर्मशाळा या तिन्ही निवासी विशेष शाळांना विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर देखभाल खर्चासाठी मिळणारे शासकीय परिपोषण अनुदान-एकूण रक्कम १ कोटी २२ लाख ४३ हजार ३०३ रुपये मागील ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच कुष्ठरुग्णांच्या उपचार व पुनर्वसन कार्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान-एकूण  २ कोटी ४६ लाख रुपये वर्षभरापासून थकीत आहेत.

 अवकाळी पाऊसाचा  मोठा फटका संस्थेच्या शेती  उत्पन्नाला बसला. ५०-६० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या व आता जीर्ण आलेल्या घरांच्या, वसतीगृहांच्या व इतर पायाभूत सुविधांच्या अत्यावश्यक डागडूजी व दुरुस्तीसाठी  मोठा निधी संस्थेला “अंतर्गत स्त्रोतांतून” खर्च करावा लागला. यांमुळे मागील ३ आर्थिक वर्षांत संस्थेच्या ग्रामीण भागांतील प्रकल्पांना प्रतिवर्ष सरासरी  ५.५० कोटी प्रमाणे रुपये १६.५० कोटींची प्रचंड आर्थिक तूट सोसावी लागली. “म्हणजेच, संस्थेने आजवर  साठवलेली रुपये १६.५० कोटींची रक्कम संपूर्णतः खर्ची पडली. संस्थेचे  कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी मदतीची गरज आहे.   संस्थेच्या सेवाकार्याची ही ७५ वर्षांची  वाटचाल आपण आणि आपणासारख्या लाखो सुजनांच्या कृतीशील पाठिंब्यामुळेच शक्य झाली आहे. तेव्हा, सद्य आर्थिक आपदेवर मात करण्यासाठी आपापल्या स्तरावर समाजातून तातडीची मदत उभी करण्याचे कळकळीचे आवाहन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी केले आहे.

आर्थिक मदतीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२५५०००६, ई-मेल: kaustubh.amte@maharogisewasamiti.org