अकोला : मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. अतिशय दुर्गम आणि खोल दऱ्याखोऱ्याचे जंगल. मेळघाटात सहसा वाघाचे दर्शन होत नसल्याचा गैरसमज. तो आता पुसल्या जात आहे. मेळघाटातील शहानूर सफारीमध्ये अकोल्यातील पर्यटकांना वाघिणीने तब्बल दीड तास दर्शन दिले. पर्यटकांनी वाघिणीची हालचाल कॅमेराबद्ध केली. मेळघाटातील डौलदार वाघिणीने वन्यजीव प्रेमींसह पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

अकोट वन्यजीव विभागातील धारगढ, गुल्लरघाट, अमोना, केलपाणी या गावांचे पुनर्वसन झाले. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना मोकळा श्वास घेता येत आहे. जंगलातील मानवाचा हस्तक्षेप कमी झाला आणि शेतजमिनीवर गवताळं मैदान तयार झाले. त्यामुळे तृणभक्षी प्राणी वाढले, ते सर्वदूर पसरले. पौष्टिक गवतामुळे चितळ, नीलगाय, सांबर याची संख्या झपाट्याने वाढली.

१४ रोजी अकोल्यातील निसर्ग छायाचित्रकार मिलिंद जोग, वनमित्र राजेश बाळापुरे आणि वन्यजीव प्रेमी आदित्य दामले यांनी शहानूर सफारी केली. सफारीमध्ये गाईड राठोड यांनी गुल्लरघाटच्या तलावत वाघिणीचे दर्शन घडून येत असल्याचे सांगितले. रणराणत्या उन्हात गुल्लरघाटच्या तलावाचे पाणी आटते आणि त्या भागात हिरवे गवत वाढले. या क्षेत्रात गवत खाण्यासाठी चितळ, सांबर यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गर्मीने त्रस्त वाघोबा देखील तलावतील पाणवनस्पतीमध्ये आश्रय घेतो. एका वाघिणीने आपला हा परिसर केला आहे. भरपूर शिकार, सावली आणि थंडगार पाणी मिळत असल्याने वाघिणीने आपले साम्राज्य तयार केले.

सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास पर्यटक दोन जिप्सीमधून गुल्लरघाट तलावावर पोहचलो. तलावावर सांबर, चितळ मुक्तपणे संचार करीत होते. त्यामुळे या ठिकाणी वाघ असेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र, अवघ्या काही अंतरावर तलावाच्या मधात पाणवनस्पती अधिक असलेल्या ठिकाणी एक वाघीण अराम करीत असल्याचे दुर्बिणीतून पर्यटकांच्या नजरेस पडले.

थोडी जिप्सी पुढे नेल्यावर वाघिणीची नजर देखील पर्यटकांवर खिळली. छायाचित्रकार मिलिंद जोग यांनी हे दुर्मीळ दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. सुमारे दीड तास ही तलावाची राणी विविध भावमुद्रेत पर्यटकांना दर्शन देत होती. परिसरातच चितळ, सांबर, मोर मुक्तपणे संचार करीत होते, मात्र कुणालाही वाघिणीच्या अस्तित्वाचा सुगवा लागत नव्हता. सुमारे दीड तासानंतर ती वाघीण दाट गवताच्या परिसरात निघून गेली. मेळघाटातील वाघोबा प्रसन्न झाल्याने पर्यटक सुखावून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ वर्षांपासूनचे प्रयत्न, अखेर मेळघाटात व्याघ्रदर्शन

२८ वर्षांपासून नियमित मेळघाटमध्ये येणे सुरू आहे. अनेक रात्र मचणावर बसून काढल्या. वाघाच्या पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करणे आदी पारंपरिक पद्धतीपासून ते ‘कॅमेराट्रॅप’ या आधुनिक बदलाचे अनुभव घेतले. वाघ सोडून सर्व वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. अखेर २८ वर्षाच्या प्रयत्नानंतर सोमवारी मेळघाटमध्ये पट्टेदार वाघिणीचे तब्बल दीड तास दर्शन घडून आले, अशी माहिती वन्यजीव प्रेमी तथा अभ्यासक आदित्य दामले यांनी दिली.