शहर काँग्रेस २० हजार कार्यकर्त्यांची फौज घडवतेय

ठाकरे म्हणाले, काँग्रेसने शहरातील सहा मतदार संघात १६ ब्लॉक केले आहेत.

विकास ठाकरे

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी; शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर काँग्रेसची जय्यत तयारी सुरू आहे. अगदी खालच्या स्तरापासून (बुथ) संघटना बांधणीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामाध्यमातून २० हजार कार्यकर्त्यांची चमू शहर काँग्रेस तयार करीत आहे. हीच चमू जनसमस्या सोडवण्यासोबतच निवडणुकीच्या काळात पक्षाला सर्वाधिक मतदान मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.

ठाकरे म्हणाले, काँग्रेसने शहरातील सहा मतदार संघात १६ ब्लॉक केले आहेत. यामध्ये दोन हजार बुथ असून प्रत्येक बुथचा अध्यक्ष आणि नऊ लोकांची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अशाप्रकारे २० हजार लोकांची चमू निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे छायाचित्र, त्यांच्या निवासाचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती असलेली डायरी छापण्यात येत आहे.

एका बुथवर साधारणत: १२०० मतदार असतात. बुथ कमिटीमधील कार्यकर्ते मतदार कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांनी मतदान केले की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम करतील. निवडणूक कोणतीही असो काँग्रेसमध्ये दोन-चार दिवसांपूर्वी उमेदवारी दिली जाते. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांचा ताळमेळ बसत नाही आणि त्याचा परिणाम प्रचारावर होतो.

हे होऊ नये म्हणून अशा प्रकारची संघटन बांधणी केली आहे. उमेदवार कुणीही असला तरी कार्यकर्त्यांची फळी तयार असेल. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवल्या जातील. काँग्रेसमध्ये अशाप्रकारची संघटनात्मक व्यूहरचना कधी नव्हती, असा दावाही विकास ठाकरे यांनी केला.

नाथुराम गोडसे नाटय़प्रयोग, नोटबंदीविरोधात आम्ही आंदोलन केले. महागाईच्या विरोधात रेल्वे रोको आंदोलन, डिझेल-पेट्रोलदरवाढीविरोधात, शेतकरी आत्महत्याविरोधात, राहुल गांधी यांना अटक झाली होती, त्याविरोधात आंदोलन केले. गेल्या चार वर्षांत केलेल्या आंदोलनामुळे माझ्यासह कार्यकर्त्यांवर २२ गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडे मेट्रोमुळे तीन महाविद्यालयीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दुपारी तीन वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत मेट्रो कार्यालयात आंदोलन केले. काँग्रेसच्या संघटनेमुळेच एका एसएमएसवर ५०० कार्यकर्ते गोळा करणे शक्य झाले, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.

सरकारचा फोलपणा जनतेसमोर मांडणार

लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे डिसेंबरपासून बुथ कमिटीचे सदस्य प्रभागनिहाय भाजप सरकारचा फोलपणा जनतेसमोर मांडणार आहेत. भाजपा सरकारने दिलेले आश्वासन आणि केलेला विश्वासघात, याचा लेखाजोखा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The city congress is building an 20000 people