देवेश गोंडाणे

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र (एसआयएसी), ‘बार्टी’ आणि ‘सारथी’ यांच्यात उत्तीर्ण उमेदवारांबाबतचे श्रेय लाटण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. या संस्थांनी जाहीर केलेल्या उत्तीर्णाच्या यादीवर नजर टाकली असता तिघांच्याही याद्यांमधील नावे सारखीच असल्याचे आढळते.

‘यूपीएससी’मध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून राज्यात एसआयएसी, बार्टी, सारथी या संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. एसआयएसी दरवर्षी ५४०, सारथी २५० आणि बार्टी २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. त्यासाठी शासनाकडून या संस्थांना कोटय़वधींचा निधी दिला जातो. मात्र, या संस्थांमधील उणिवांमुळे निकालाची टक्केवारी वाढत नसल्याने आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक संस्था उत्तीर्ण उमेदवार आपलाच असल्याचा दावा करीत आहे. 

‘बार्टी’चे प्रशिक्षणच बंद

‘बार्टी’कडून दिल्ली येथे विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, २०१९ पासून ते बंद आहे. मग, उत्तीर्ण उमेदवारांवर दावा कसा केला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘बार्टी’च्या यादीतील बहुतांश उमेदवार हे आधीच प्रशासकीय सेवेत असून त्यांनी कधी तरी ‘बार्टी’मध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्या आधारावर ‘बार्टी’ आपली पाठ थोपटून घेत असल्याचा आरोप होत आहे. ज्याप्रमाणे खासगी शिकवणी संस्था व्यावसायिक हेतूने उत्तीर्ण उमेदवारांवर दावा करतात तशीच काहीशी स्पर्धा राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू आहे.

यशवंत नक्की कोणाचे?

‘बार्टी’ने आपले सात, ‘एसआयएसी’ने ३१ आणि ‘सारथी’ने १२ उमेदवार उत्तीर्ण झाल्याचा दावा यादीद्वारे केला आहे. मात्र गमतीची बाब अशी की, ‘बार्टी’च्या यादीतील सहा उमेदवार हे आमचे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा दावा ‘एसआयएसी’नेही केला आहे. ‘बार्टी’च्या यादीतील सहा उमेदवारांची हीच नावे ‘एसआयएसी’च्या यादीमध्येही आहेत. असाच घोळ ‘सारथी’च्या यादीत असून त्यांच्या १२ उत्तीर्ण उमेदवारांपैकी सहांची नावे ‘एसआयएसी’च्या यादीत आहेत.

यश आमचे, वाटा त्यांचा कसा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात उत्तीर्ण उमेदवारांशी चर्चा केली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या शंभरांत उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराने सांगितले की, मी ‘बार्टी’ किंवा ‘एसआयएसी’ या संस्थांमधून कधीही प्रशिक्षण घेतलेले नाही. केवळ ‘एसआयएसी’ने दिल्लीत घेतलेल्या एका दिवसाच्या सराव मुलाखतीचा लाभ घेतला. त्यामुळे एक दिवस मुलाखतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आमच्या यशाच्या वाटेकरी कशा?