अमरावती : एका लग्‍नसमारंभादरम्‍यान मंगल कार्यालयातील एका खोलीत मुलींचा कपडे बदलतानाचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या युवकाला वऱ्हाड्यांनी चोप दिल्‍याची घटना अंजनगाव सुर्जी येथे घडली. आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मद फुजेल मो. शौकत (२३, रा. काजीपुरा, इमाम चौक, अंजनगाव सुर्जी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा लग्नसमारंभ तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजित करण्‍यात आला होता. गुरुवारी रात्री काही मुली मंगल कार्यालयातील एका खोलीत तयार होत होत्या. त्यावेळी एका तरुणाने खिडकीतून चोरून त्या मुलींचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्‍यावेळी काही वऱ्हाड्यांनी आरोपीला पाहिले. त्‍याला जाब विचारण्‍यात आल्‍यानंतर त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काही तरुणांनी त्याचा मोबाईल तपासल्‍यावर त्यात रेकार्डिंग दिसून आली. ते कळताच मंगल कार्यालयात गोंधळ उडाला.

हेही वाचा – नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला.आरोपी तरुणाने मार बसल्यानंतरही ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा कायम ठेवला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्‍यानंतर त्याने स्वत:ची ओळख मोहम्मद फुजेल मो. शौकत अशी सांगितली. त्याच्याकडून तीन मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पाठोपाठ आरोपीने ज्या मुलींचे कपडे बदलतानाचे रेकॉर्डिंग केले, त्या मुलींची नातेवाईक असलेली ५२ वर्षीय महिला अंजनगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.