अकोला: मराठा आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांनी जिल्ह्यात येऊ नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. काही ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवी गजानन हरणे यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचार शासनाने पुरवावे. त्यांच्या जीविताला धोका झाल्यास पूर्ण जबाबदारी शासनाची राहील.

हेही वाचा… अकोल्यात क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर सट्टा; पोलिसांनी छापा टाकून तिघांना पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाने मंत्र्यांना जिल्हा बंदी तर आमदारांना गाव बंदी केली आहे. पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा सुद्धा देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री आणि पालकमंत्र्यांना कुठल्याही शासकीय व अशासकीय कार्यक्रमाला बोलावू नये, मंत्री व पालकमंत्री यांना न येण्याचा सल्ला द्यावा, मराठा समाजाच्या तीव्र भावना समजावून घेऊन उपयोजना कराव्यात, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. यावेळी विनायकराव पवार, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, कृष्णा अंधारे, प्रदीप चोरे, धनंजय दांदळे, शंतनू वसू, सुनिता ताथोड, संजय सूर्यवंशी, धीरज देशमुख, काशिनाथ पाटेकर, माधुरी वाघमारे, रश्मी पाटेकर, डॉ अमोल रावणकार, अनुराधा ठाकरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.