गडचिरोली : नक्षलग्रस्त, मागास आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सामान्य समजल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर कारवाफा येथील २३ वर्षीय साधना जराते यांच्या मृत्यूनंतर समजातून संताप व्यक्त करण्यात येत असून विधिमंडळातदेखील यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा यामुळे गडचिरोली येथील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र कायम चर्चेत असते. मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतले, त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतले. पण हे चित्र जैसे थे असल्याने जिल्ह्यातील गरीब, आदिवासी जनतेच्या जीवनाची काही किंमत नाही का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो आहे.

हेही वाचा – दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची ज्येष्ठतासूची प्रसिद्ध, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली सारख्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजही अनेक पदे रिक्त आहे. यातील काही पदे जिल्हा मुख्यालयी बेकादेशीर प्रतिनियुक्ती दिल्याने रिक्त असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यावर स्थानिक मंत्र्यांनी सांगितल्यावरदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनियुक्त्या रद्द करण्यास टाळाटाळ करतात. परिणामी दुर्गम भागात आरोग्य सेवा अपुरी पडत आहे.

एटापल्ली तालुक्यात दुर्गम भागात नियुक्ती असलेल्या डॉ. मशाखेत्री हे मागील काही वर्षांपासून मुख्यालयी ठाण मांडून बसले आहे. तर औषधी भांडारात गैव्यवहारप्रकरणी निलंबित झालेले औषध निर्माण अधिकारी मिराणी हेदेखील अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने निलंबनानंतर आधी प्रतिनियुक्ती आणि आता कायम नियुक्तीवर त्याच ठिकाणी कार्यरत आहे. तर सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागात कार्यरत औषध निर्माण अधिकारी होकम हेदेखील प्रतिनियुक्तीवर औषध भांडारात कार्यरत आहेत. असे अनेक कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने प्रतिनियुक्तीवर किंवा नियुक्तीवर जिल्हा मुख्यालयी कार्यरत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असते. यामागे कोट्यावधींच्या औषध व साहित्य खरेदीची किनार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. म्हणूनच मंत्र्यांनी निर्देश दिल्यावरही हे प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अभय देत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आरोग्याचा मुद्दा चर्चेत आल्याने प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा : आमदार पाटील

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी दोषी डॉक्टर व त्यांना अभय देणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांना निलंबित करून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोबतच डॉ. साळवे यांच्या काळात अनेक माता व बालमृत्यू झाले. याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. पुढील कारवाई समितीचा अहवाल आल्यावर केल्या जाईल. तर प्रतिनियुक्तीच्या प्रश्नावर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. – आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिप गडचिरोली