नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार नेहमी चर्चेत असतो. तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका छायाचित्रकाराला पोलीस ठाण्यात आणून बेदम मारहाण केली. वाहन चोरीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ६० हजार रुपये उकळले आणि सोडून दिल्याची घटना उजेडात आली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वाठोड्यातील अनमोलनगरात राहणारा निलेश हा छायाचित्रकार म्हणून व्यवसाय करतो. त्याच्या घरी संदीप (सिवनी-मध्यप्रदेश) नावाचा युवक पाच वर्षांपूर्वी भाड्याने राहत होता. तो ६ डिसेंबरला नागपुरात आणि निलेशच्या घरी गेला. त्याने गावी जात असल्याचे सांगून दुचाकी घरात ठेवू देण्याची विनंती केली. संदीप ओळखीचा असल्यामुळे त्याने दुचाकी ठेवण्यास परवानगी दिली. ११ डिसेंबरला हुडकेश्वर पोलिसांनी संदीपला अटक केली. त्याने दुचाकीचोर असल्याची कबुली दिली. त्याने दुचाकी घरमालकाच्या घरी ठेवल्याचे सांगितले. हुडकेश्वरमधील एक पोलीस कर्मचारी निलेशच्या घरी आला. त्याने दुचाकीबाबत विचारणा केली. निलेशने लगेच दुचाकी घरासमोर उभी असल्याचे सांगून मित्र संदीपची असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याने निलेशला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नेले. तेथे संदीपसह दोन आरोपी असलेल्या खोलीत बंद केले. निलेशला जबर मारहाण करण्यात आली. आरोपींनीही निलेशला चोरीच्या दुचाकीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. तरीही संदीप, डोईफोडे आणि राहुल या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आणि एक लाख रुपयांची मागणी केली. निलेशने नातेवाईकांकडून ६० हजार रुपये आणले आणि हुडकेश्वर पोलिसांना दिले. त्यानंतर निलेशची सुटका करण्यात आली. मात्र, पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आजारी पडलेल्या निलेशने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून न्याय मागण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – वर्ध्यातून प्रियंका गांधी यांना लढवावे, कोणी केली मागणी वाचा…

हेही वाचा – चंद्रपूर : वाढते प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक, २०२३ मध्ये केवळ ३२ दिवस आरोग्यासाठी चांगले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाबाबत मी प्राथमिक माहिती घेत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून पडताळणी करणार आहे. जर असा प्रकार घडला असेल तर निश्चितच दोषी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. – विजयकांत सागर, (पोलीस उपायुक्त, झोन-४)