दिवाळीसाठी शासनाने दिलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे आता गुडीपाडवा व आंबेडकर जयंतीला शिधा वाटप करताना पूर्वीच्या चुका टाळून तो वाटप करावा, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.

हेही वाचा- जन्म-मृत्यूच्या दाखल्यासह ४० सेवा खोळंबणार, आजपासून राज्यात संगणक परिचालकांचे आंदोलन

शासनाने अलीकडेच दिवाळी प्रमाणेच गुडीपाडवा व आंबेडकर जयंतीला शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थी या योजनेस पात्र ठरणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडील नोंदीनुसार, ग्रामीण भागात ४ लाख २० हजार तर शहरात ३ लाख ९२ हजार शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात प्रत्येकी एक किलो साखर, पामतेल आणि रवा, चणा डाळ देण्याचे नियोजन आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे सरकारने ही योजना दिवाळीत राबवली होती. मात्र अनेकांना दिवाळी झाल्यावर शिधा मिळाला. काहींना टप्प्या टप्प्याने मिळाला तर मोजक्याच शिधापत्रिकाधारकांना एकत्रित शिधा मिळाला होता.

हेही वाचा- गोंदिया : रस्ते खडीकरणाच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ; एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यंत घाईत ही योजना राबवल्याने अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहून गेल्या अशी कबुली सरकारकडून देण्यात आली होती व जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या पुरवठादारांवरही कारवाई करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान केली होती. आंबेडकर जयंती व गुडीपाडव्याला शिधा वाटप करताना सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना ठरलेल्या तारखेपूर्वी शिधा वाटप केला जावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना वेळेत शिधा वाटप केला जाईल, असा विश्वास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.