वर्धा : राज्य शासनाने केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात काही बदल प्रस्तावित होते. ते आता करण्यात आले आहे. फुले आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपये होते. ते आता केंद्राप्रमाणे पाच लाख रुपये करण्यात आले आहे.

मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी आता उपचार खर्च प्रती रुग्ण अडीच ऐवजी साडे चार लाख रुपये देय असतील.सध्या केंद्राच्या आरोग्य योजनेत १२०९ व्याधी साठी तर राज्याच्या ९९६ व्याधीसाठी उपचार खर्च लागू आहे.आता मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात आले आहे.तर मागणी असलेल्या ३२८ नव्या उपचारांची भर टाकण्यात आली आहे.दोन्ही आरोग्य योजनेत आता समान म्हणजे १३५६ उपचार राहणार आहेत.यापैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयासाठी राखीव करण्यात आले आहे.या योजना राज्यातील एक हजार रुग्णालयासाठी लागू आहेत.आता त्यात वाढ करण्यात आली असून ही संख्या १३५० वर पोहचली आहे.