नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पकड सैल होईल, या धास्तीतून तीन वर्षांपासून राज्यातील नगर पंचायती ते महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या दावणीला बांधला गेला आहे. तळागाळातल्या जनतेच्या जगण्या मरण्याशी निगडीत समस्यांवर उत्तर देण्यास कोणीही बांधील नसल्याने नागरी सुविधा व्हेंटिलेटवर आल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. उत्पन्नाचे घटलेले स्रोत आणि बेबंदशाहीमुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची अवस्था बिकट झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. तीच अवस्था बेसा बेलतरोडी आणि पिपळा – घोगली या दोन ग्रामपंचायतींचे एकत्रिकरण करीत बाळसे धरलेल्या बेसा – पिपळा नगर पंचायतची आहे. नागपूरचे नवे उपनगर म्हणून हा भाग वेगाने विकसित झाला असला तरी तो वसण्या आधीच बकाल झाला आहे.

नियोजन शुन्य कारभार, अपुऱ्या सुविधा, पायाभूत सुविधांची कमतरता, रस्ते, वीज, पाणी सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक, त्यामुळे होणारी अनागोंदी अशा विचित्र कोंडीत नवे शहर अक्षरशः बकाल झाले आहे. स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याने हा परिसर आजाराचे माहेरघर बनत आहे. दिवस मावळताच वाहनांच्या २- २ किलोमिटर लांब रांगा रोजचची डोकेदुखी झाली आहे.

नोकरदारांवर पश्चातापाची वेळ

एअर पोर्ट डायव्हर्जन पूल झाल्यापासून मनिष नगर, पिपळा, बेसा, बेलतरोडी भागात निवासी संकुलांची संख्या झपाट्याने वाढली. मिहान, बुटिबोरी एमआयडीसी, आयटी पार्क मधील संगणक अभियंत्यांपासून ते मध्यम उत्पन्न गटातल्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात घर घेणे परवडणारे नसल्याने येथे गुंतवणूक करीत निवासासाठी नव्या नागपूरला प्राधान्य दिले. त्यामुळेच अन्य भागांच्या तुलनेत बेसा-बेलतरोडीतला विकास वेगाने झाला. मात्र सध्याची परिस्थिती पाहता येथे घरात गुंतवणूक केलेल्यांच्या नशिबी पश्चातापाचे अश्रू येत आहेत.

विकासक नियंत्रणाबाहेर

कोणतेही ले आऊट विकसित करताना वाहन तळ, मोकळी जागा, मैदान आरक्षित ठेवणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र बेसा बेलतरोडी, पिपळा भागातील विकासकांनी यातला एकही नियम पाळला नाही. नियमानुसार मोकळे सोडावे लागणारे भूखंडही विकले गेल्याने वाहतूक समस्या भीषण बनली. स्थानिक व्यवस्थेचा त्यावर अंकूश नाही. सर्वांना मॅनेज करणे शक्य असल्याने विकासक नियंत्रणाबाहेर गेले आहेत. अनधिकृत लेआऊट ही वेगळीच डोकेदुखी आहे.

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

मानेवाडा ते पिपळा फाटा, ओंकार नगर ते बेसा, मनिष नगर ते बेसा कोणत्याही भागात सायंकाळी पाच नंतर चक्कर मारून पहा. वाहतूक व्यवस्थेची लक्तरे दिसतील. शहरातल्या वसुलीत रस असलेल्या पोलिसांचे यावर नियंत्रण नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कोंडी होते. पोलिसांनी नो पार्किंग झोनचे डिमार्केशन केलेले नाही, की बेशिस्त पार्किंग नियंत्रणासाठी वाहने उचलली जात नाहीत. त्यामुळे कोंडीमुळे वाढून वाहनांच्या दूर- दूर रांगा कायमची डोकेदुखी बनली आहे.

ग्राहकांची वाहने रस्तावर

राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांची प्रतिष्ठाने या भागात आहेत. मोजक्या प्रतिष्ठानांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था असली तरी तिथे पैसा द्यावा लागतो. त्यामुळे ग्राहक रस्त्यांवर जागा दिसेल तिथे वाहने लावतात. सायंकाळी बाजारात गर्दीईतकीच वाहने दिसतात. परिणामी आधीच अरुंद रस्ते आणखी अकुंचन पावतात आणि वाहतूक कोंडी होते.

अनधिकृत ले आऊट हे या भागातले वास्तव आहे. विकासकांनी मोकळी जागा, वाहनतळाच्या जागाही विकल्या आहेत. त्यातून कोंडी होते यात तथ्य आहे. नगर पंचायतीने मनिष नगर टी पॉईंट ते बेसा चौक मार्गावर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वाहन थांबविण्यास मनाई केली आहे. नगर पंचायतीच्या अखत्यारित मोकळ्या जागांवर वाहनतळाचा प्रयत्न सुरू आहे.-भारत नंदनवार, प्रशासक, बेसा पिपळा नगर पंचायत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनतळांची व्यवस्था करणे, ही व्यापारी प्रतिष्ठानांची जबाबदारी आहे. गरज पडेल तिथे नो पार्किंग सक्तीची केली जाईल. तरीही बेशिस्त आढळली तर वाहनधारकांवर कारवाई होईल. – लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.