लोकसत्ता टीम

नागपूर : पावसाचा जोर वाढल्याने धावती वाहने बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. असे का घडते, याचा शोध घेतला असता वाहनाच्या इंधन टाकीत पाणी शिरल्याचे समोर येत आहे. पेट्रोलपंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी शोधणारी यंत्रणाच नसल्यामुळे असे घडत आहे. यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची आहे. परंतु, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पेट्रोलपंप चालक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉलला परवानगी दिली आहे. या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये थोडेही पाणी गेल्यास इथेनॉलवर प्रक्रिया होऊन ते सडते व त्यामुळे पेट्रोलपंप चालकांचे मोठे नुकसान होत, असे विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘हे’ अॅप कामकाजात वापरणे अनिवार्य; सुरक्षा प्रथम म्हणून हा उपाय…

पेट्रोलपंपावरील इंधनाच्या टाकीत पाणी गेले असेल तर एक विशिष्ट रसायन असलेली पेस्ट टाकल्यावर ती गुलाबी होते. परंतु, इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यास पेस्ट गुलाबी होत नाही. त्यामुळे टाकीत पाणी असल्याचे पेट्रोलपंप चालकांना कळत नाही. मुंबईत काही पंपांवर अशी नवीन यंत्रणा उपलब्ध आहे ज्याद्वारे इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या टाकीत पाणी असल्यास लगेच कळते. परंतु, ही यंत्रणा राज्यातील इतर भागात उपलब्ध नाही.

“ पेट्रोलियम कंपन्यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व पेट्रोलपंपातील इंधन टाक्यांची तपासणी करायला हवी. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे इंधन टाकीत पाणी शिरल्यास पंप चालकांचे नुकसान होते. तेच पाणीमिश्रित पेट्रोल ग्राहकांच्या वाहनात गेल्यास ते संतापतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यायला हवी.” -अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.

आणखी वाचा-वडेट्टीवार यांचे कृषिमंत्री व सचिवांना पत्र, विरोधी पक्ष नेत्याच्या मतदार संघात…

अधिकारी काय म्हणतात?

“हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या नागपूर डेपोचे प्रमुख सोमेश सिंग म्हणाले की, मी या विषयावर बोलण्यासाठी अधिकृत व्यक्ती नाही. भारत पेट्रोलियमच्या नागपूर डेपोचे प्रमुख देविदास पांझाडे म्हणाले, नागपुरात पेट्रोलपंपांवरील टाकीत पाणी शिरल्याच्या तक्रारी नाहीत. इथेनाॅल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी शिरल्यास ते वेगळेच दिसत असल्याने ओळखता येते. पंप चालकांनी स्वत: काळजी घेतल्यास टाकीत पाणी शिरू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात पेट्रोल पंप किती?

केंद्रिय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२२ पर्यंत उत्तर प्रदेशामध्ये देशातील सर्वाधिक म्हणजे ९ हजार ९४२ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. तर महाराष्ट्र ७ हजार ४६८ पेट्रोल पंपांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये ६ हजार ६५१ पेट्रोल पंप, राजस्थानमध्ये ५ हजार ८७१ पेट्रोल पंप, कर्नाटकमध्ये ५ हजार ७८४ पेट्रोल पंप आहे.