लोकसत्ता टीम

नागपूर : हवामान खात्याने सप्टेंबरच्या अखेरीस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, मान्सूनची उशिरा झालेली सुरुवात, ऑगस्ट महिन्यात घेतलेली मोठी विश्रांती यामुळे राज्यात अजूनही पावसाची नऊ टक्के तूट आहे.

मध्य महाराष्ट्रात २० टक्के, मराठवाड्यात २४ टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा आणि पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरचा पहिला आठवडा या काळात राज्यभरात सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवला. त्यानुसार, २८ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतात सरासरीहून अधिक पाऊस असेल. त्यानंतरही २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीतही मध्य भारतात सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे.

आणखी वाचा-धक्कादायक..! राज्यात प्रत्येक ३९ मिनिटाला एक नवजात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या काळात संपूर्ण राज्यभरातही सर्वदूर पाऊस असेल. त्यानंतर ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर १२ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत कोकण विभाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात साडे सात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.